14 January, 2008

शिदोरी

शिदोरी

नामदेवांचा एक सुंदर अभंग आहे :

'रामकृष्णहरि' जप ममत्त्वे साधावा ।
अहंकार टाकावा, समबुद्धि ॥ १ ॥
निवृत्ति योगे पुण्य होईल अगाध ।
एका नामें गोविंद तुष्ट सदा ॥ २ ॥
नामदेव म्हणे सद्‍गुरुपासोनी ।
नाम घ्यावे जाणोनि ना ना कांही ॥ ३ ॥

भगवंताचे गुण व स्वरूप यांपासून भक्ताच्या अंतःकरणांत निर्माण होणार्‍या भावना व भाव, भगवत वत्सल ईश्वराचे भक्तावरील प्रेम व भक्ताची देवावरील भक्ति, संत/श्रीगुरु हीच देवाची प्रत्यक्ष रुपडी म्हणूनच देवाप्रमाणें, प्रसंगी देवाहून कांकणभर अधिकच, संतांवर/श्रीगुरुवर असणारा विश्वास, देवाला भक्तानी करावयाची काकुळतीची प्रार्थना, व भक्तिप्रेमाची याचना या गोष्टींना नामस्मरण साधनेंत फार फार महत्त्व आहे.

साधनेला लागल्यानंतर सुद्धा साधकाने सद्‍गुरुला/संतांना देवपण कशाने (कोणत्या साधनांनी) आले त्य साधनांचा विचार नित्य करावयास हवा. त्याचबरोबर आपल्या परमार्थ प्रवृत्तीची कारणें, सद्‍गुण संवर्धन, व देव-भक्तांचे / सद्‍गुरु-शिष्याचे नातें या गोष्टींचा सातत्याने विचार करावयास हवा.

या सगळ्या विचारांना परमार्थ पदावर चालतांना लागणारी 'शिदोरी' असं म्हणतात. त्याचबरोबर नित्यानित्यविवेक, अपूर्णतेची जाणीव, परमात्म्याच्या अगाध लीलासामर्थ्याची जाणीच ही देखील एक प्रकरची छान, पवित्र, पौष्टीक, स्वादिष्ट, खुसखुशीत अशी शिदोरीच आहे.

हा परमार्थ प्रवास फारच लांबचा, दीर्घकाल चालणारा असल्याने, एकदा सुरुवातील निघतांना तयार करून घेतलेली शिदोरी मुक्कामाच्या टोकापर्यंत पुरत नाही, तर चालत असतांना (म्हणजे अखंड नामस्मरण करतांना) वाटेंत त्या शिदोरींत सारखी सारखी भर घालावी लागते. जसा जहाजावर, समुद्रांतून प्रवास करतांना, दर बंदरावर गोडे पाणी व अन्न यांचा साठा करावा लागतो, वाफेवर चालणार्‍या गाडीच्या इंजिनांत जसा वारंवार पाणी व कोळसा भरावा लागतो, त्याचप्रमाणे या 'नामस्मरणस्वरूप' परमार्थ पदावर देखील, मुक्कामाला जाईपर्यंत वरील वर्णन केलेल्या साधनांचा विचार पुनः पुनः करावा लागतो.

भगवंताचा साक्षात्कार व वरील विचारांचे श्रवण-मनन-निदिध्यास यांचा अनोन्य संबंध आहे तसाच श्रीगुरु-शिष्य देवभक्तांचे नात्याचा संबंध पण अतिशय महत्त्वाचा. श्रीगुरु-शिष्य वा देव-भक्त या नात्याच्या विचाराने, आचाराने आपला भाव वाढतो. या चढत्या वाढत्या भावामुळें साक्षात्काराला फार मोलाची मदत होते, व साक्षात्कारामुळे श्रीगुरु-शिष्य / देव-भक्तांचे नाते अधिकाधिक गोड, दृढ होऊन भाव अधिकच वाढीस लागतो. याप्रमाणे भाव आणि साक्षात्कार, परंपरांच्या सहाय्याने अनेक पायर्‍यांनी वाढतच जातात. आणि शेवटी पूर्ण साक्षात्कार म्हणजेच पूर्णभाव, पराभक्ति, भगवंत होऊन भगवंताचे नामस्मरण, शिव होऊन शिवाला भजणे, अशी पूर्णावस्था लाभते.

कां सारखा हा शिदोरीचा विचार करावयाचा ? तर माणसाला विस्मरण फार ! त्यांत पुनः मौजेची (परमार्थाच्या दृष्टीने फार घातकच) गोष्ट म्हणजे 'हवें ते विसरायचे व नको तें मात्र न विसरतां स्मरणांत ठेवायचे.

म्हणून परमार्थांत आरंभ-शूर फार, पण शेवटचा मुक्काम गाठणारे विरळाच नाही कां ? म्हणून श्रीसमर्थांनी अगदी आग्रहानी सांगितले "केलेंचि करावे भोजन । घेतलेंचि घ्यावे जीवन । तैसे श्रवण आणि मनन । केलेंचि करावें ॥

सर्व परमार्थपर ग्रंथांतून देहादिप्रपंचाच्या असारत्वाची व भगवंताच्या सारसर्वस्वाची नित्य यशोगाथा वर्णन केलेली असते. भगवंताचे/श्रीगुरुंचे सामर्थ्य, कृपा, ऐश्वर्य आदिंचे वर्णन असते. कशासाठी ? तर भक्तिभाव वाढण्यासाठी. हरिकथेंत याच गोष्टींचे वर्णन. साधकाने या गोष्टी नैमित्तिक न करतां सातत्याने करावयास पाहिजे. आपण श्वासोश्वास कधी कधी करतो का ? तर नाही ना ? तो सतत अखंड अविरत चालूच असतो. नाम असे चालू रहावयास हवे नाही का ??

अण्णा -

1 comment:

Anonymous said...

अतिशय सुंद्रर लेख आहेत आपले ...
आण्णा चि पत्रे पुस्तक रुपात उपलब्ध आहेत का ?
-- उदय