10 January, 2008

अध्यात्म

अध्यात्म


माणसाला जर "अध्यात्म" यथार्थ कळले तर, हे जग काय ? हा जीव कोण ? जगाचा-जीवाचा संबंध काय ? ब्रह्म काय ? आणि या ब्रह्माचा वरील सर्वांशी (जीव आणि जगाशी) कशा प्रकारचा संबंध ? एव्हढ्या गोष्टी मूलभूतदृष्ट्या समजल्या तर "आपण कोण ?" आपले स्थान काय ? या सर्वाची निश्चित जाणीव हो‍ईल.

बाह्य दृष्य-जगाचा व आपल्या स्थूल-सूक्ष्म-कारण देहाचा तादात्म्यभाव सुटल्याशिवाय "सुखरूपता" नाही हेंच खरें. आकाशांतील गंधर्व नगरीच्या विस्ताराप्रमाणे, डोक्यांत विचारांचे (आत्मविचार सोडून हं) वादळ सुटलेले असते तोंवर आत्मारामाचा अनुभव येणार नाहीं हें त्रिवार सत्यच.

सूर्यप्रकाशाच्या ठिकाणीं कोळशाची पूड पडलेली पाहून, त्या कोळशाच्या काळेंपणामुळें सूर्यावर कृष्णवर्णाचा आरोप करतां ये‍ईल कां ? तर मुळीच नाही.

गाढ झोपेंत "मी"चें भान नसतें, पण म्हणून तेथें कांहींच नाही असें होत नाही. त्या ठिकाणी न कळत पण आहेंपणाचें भान हें असतेंच असतें; आणि म्हणून तर झोपेंतून उठल्यानंतर झोपेचा आनंद जाणवत असतो.

वाहत्या पाण्याला भूमीचा गुण-रंग हा लागतोच. स्वच्छ पाण्यांत काचेचा भास होणारच. त्याचप्रमाणें गाढ अज्ञानाचें मुळाशीं न कळत कां हो‍ईना, जीवेश्वराचें अस्तित्व असतेंच. या जीवेश्वराच्या अस्तित्त्वामुळेंच या बाह्य वस्तु असतात, डोळ्यांना त्या दिसतात, आणि मनाला भासतात. कार्य-कारणांची ही मोठी विलोभनीय वर्तुळ परंपरा जगाच्या उत्त्पत्तिपासून अखेरपर्यंत अशीच चालत राहणारच. ही वर्तुळ परंपरा वेदान्ताच्या - संतवाङ्‍मयाच्या अभ्यासानें समजून घेतलीं म्हणजे मग "रम्य-समाधान" लाभते बरं !!

एखाद्या व्यसनाधीन माणसाला तें व्यसन आपल्या नादीं लावून जसे नाचवतें, त्याप्रमाणें ही सगळीं शरीररूपी यंत्रें आंत खेळत असलेल्या एका शक्तीनें अव्याहत कार्यपर असतात. यंत्रातून खेळणारी विद्युत-शक्ति ज्याप्रमाणे सार्‍या यंत्राला चालविते त्याप्रमाणेच.

आशा सार्‍या जगाला आपल्या नादीं लावून, आपल्या म्हणण्याप्रमाणेंच नाचवीत असते, या आशेला जगाला भुलविण्याचें सामर्थ्य जर कशामुळें प्राप्त झालें असेल, तर तें या दृष्याच्या लालीमुळेंच. आपल्या सर्व धमन्यांमधून जसें रक्त वाहतें, त्याप्रमाणेंच सर्व प्राणीमात्राच्या कार्यांतून सुखाची आशा अव्याहत प्रवाहरूपानें वाहत असतें. जीवाला बांधून आपल्यामागें पळावयास लावणारी अशी ही आशेची विचित्र मोहक शृंखला सर्व जीवांच्या पायांतून जखडून गेल्यामुळेंच हें सर्व जग सुखाकडें (?) दृष्टी ठेवून त्याच्या प्राप्तीकरतां सारखें आशेच्या मागें धांवत सुटलें आहे.

हे विश्व ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. यांत असलेल्या सर्व पदार्थांच्या सहाय्यानें यांतील सर्व माणसें जर कशाचा सारखा शोध करत असतील तर तो या सुखाचाच. या सुखाच्या भावनेचा उगम जरी मन, बुद्धि इंद्रियांच्या बाह्य पदार्थांशी संयोग हो‍ऊन जरी [अंतःकरणात] होत असला, तरी आत्म-विचाराच्या दृष्टीनें पाहूं गेलें असतां या संबंधापेक्षा/हून कुठेंतरी वेगळीकडेंच या सुखाचा खरा ठेवा आहे. आणि मनु बेटा या सुखाच्या मूळ उगमस्थानाचा [म्हणजेच अत्यंत सुखरूप अशा भगवंताचा] शोध लागला म्हणजे मगच जीवाला निरंकुश, नितांत, तृप्तिकर, निरतिशय, निरुपाधिक, नित्य, निर्व्याज, निर्मळ सुखरूपतेचा लाभ होतो.

खारें पाणी जसें तहानलेल्या माणसाची तृप्ति करत नाही, तसेच दृष्याचे सत्यत्व कोणालाहि तृप्तीकारक ठरत नही. 'यद अल्पं, तन मर्त्यम '. जें जें अल्प, मर्यादित, परिच्छिन्न तेंच मर्त्य - म्हणजे नष्ट होणारे असतें. अल्प वस्तू पूर्ण होत नाही. तसेंच अल्पवस्तूंत पूर्ण वस्तुचा समावेशहि अशक्यच. जें जें अल्प तें तें कार्य. म्हणून कार्य हें कारण हो‍ऊं शकत नही. म्हणून एक भगवंतच पूर्ण.

-- अण्णा

3 comments:

Anonymous said...

अतिशय सुंद्रर लेख आहेत आपले ...
आण्णा चि पत्रे पुस्तक रुपात उपलब्ध आहेत का ?
-- उदय

एकोहम् said...

अण्णा म्हणजे अण्णा घाणेकर निरूपणकार आहेत. अतिशय प्रसिद्धी पराङ्‍मुख वृत्ती असल्यामुळे हे त्यांच्या ह्या साहित्याचे पुस्तक रुपाने कसे प्रकटन करायचे हा प्रश्नच आहे. अण्णा आपल्या एका शिष्याला पत्रातून बोध करतात आणि त्यातले एक पत्र जेव्हां मला वाचायला मिळाले तेव्हां मी ठरवले की हा मेवा इतरांनाही मिळावा म्हणून हा उपद्‍व्याप. आपल्याला आवडले हे कळल्यामुळे माझ्या टंकलेखनाचा उपयोग झाला याचे मला समाधान.
एकोऽहम्‌

Anonymous said...

khupach sundar...upalabdha karun dilyabaddal dhanyavad... a reader