25 January, 2008

समाधान

समाधान

धर्म आणि अध्यात्म यांमध्ये खूपच मोठा फरक आहे. धर्मानें अध्यात्माचें रक्षण केलं जात असेल, पण धर्म म्हणजे कांही अध्यात्म नाही, याचं नेमक भान असलं पाहिजे. जसं कुंपण पिकाचं रक्षण करतं , पण म्हणून कुंपण म्हणजे कांही पिक नव्हे.

धर्म हा बर्‍याच वेळी अध्यात्माची गळचेपी करत असतो. त्याचे कर्मकांड करून टाकतो. आपल्याला श्रीगुरुंकडून प्राप्त झालेल्या उपासनेचं कर्मकांड होऊं देता कामा नये. म्हणजे काय ? तर उदाहरणार्थ , वेळा पत्रक ठरलं की - " रोज ५॥ ला फिरायला जायचं, फिरून आल्यावर स्नान करायचं, मग देवपूजा करायची, आणि पूजा झाल्यावर अर्धा तास 'जप' करायचा ", की झालं आपलं काम. आता आपला आणि देवाचा संबंध संपला उद्यापर्यंत. असं होता कामाचं नाही बरं ! मग हे अध्यात्म काय आहे ?

अध्यात्म शब्दाचा अर्थ असा आहे- अधि+आत्म. आत्म्यासंबंधी म्हणजे माझ्यामधला जो परमात्मा आहे, जो कीं सर्वांच्यात आहे, तो एकच आहे. आपल्यात जो खरा 'मी' आहे [आतला मी] त्याच्याशी अखंड अनुसंधान, त्याचं स्मरण, अनुभव म्हणजे अध्यात्म.

आत्मा कसा आहे ? तर तो अत्यंत शाश्वत आहे. काय गंमत आहे बघ. साडी आणायला गेलात, साडी पसंत केली; आणि काय विचारलं ? रंग पक्का आहे ना ? दुकानदार म्हणतो, " अगदी पक्का आहे; जर गेला तर परत घेईन". घेत नाहीत कधी. पण नुसतं बोलायला काय जातं, नाही का ?

आता तुम्हीच विचार करा. आपण अशाश्वत. साडी जेम तेम वर्ष दीड वर्ष टिकणारी, देणारा-विकणारा अशाश्वत, पैसा अशाश्वत. रंग मात्र या सगळ्यांत आपल्याला शाश्वत पाहिजे ! म्हणजे अशाश्वतांत आपणच शाश्वत शोधतो. आपण गॅरंटी मागतो. म्हणजे एक प्रकारे शाश्वतताच मागतो. अशाश्वतांत शोधून शाश्वत कसं हाती येणार, नाही कां ??

मग शाश्वत तरी काय ? शाश्वत आहे एक समाधान. समाधान हा जीवनाचा धर्म आहे. कुत्री मांजरं यांच्या शरीराच्या गरजा भागल्या कीं ती स्वस्थ झोपून जातात. माणसांत आणि प्राण्यांत हा मोठाच फरक आहे कीं, त्याला भगवंतानें विकसित मन दिले आहे. त्यामुळे शरीराच्या गरजा भागून सुद्धां तो शांत, तृप्त होत नाही. मनाचं समाधान व्हावं लागतं. मनाची शांतता ती खरी शांतता. मनाचं समाधान हे खरं समाधान.

मग आपल्याला काय हवे ? काय मिळाले पाहिजे ? तर जन्मभर पुरून उरेल असं समाधान. या देहांत, या अशाश्वत अशा देहांत, संपूर्ण समाधान अनुभवत राहणे म्हणजे अध्यात्म.

जसे जसे दिवस जातील, तसे तसे समाधान वाटायला पाहिजे. याचं नाव समाधान. समाधान कायमस्वरूपी आहे. त्याला घट नाही. अव्यय आहे. त्यालांच वेदांत अक्षर असें म्हणतात.

समाधान म्हणजे तरी काय ? समाधान शब्द समाधीशी संबंधीत आहे. ती स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. 'सम+धी'. म्हणजे बुद्धी नव्हे, तर प्रज्ञा सम होणे म्हणजे समाधी. एक गंमतीशीर बाहुली असते बघ, कशीही टाका, फेका ती नेहमी उभीच राहते, तशी प्रज्ञा.

म्हणजे समाधान याचा अर्थ असा की देह, प्रपंच कोणत्याही अवस्थेत असला तरी मन भगवंताला चिकटून असणं. म्हणजेच अध्यात्म. मन भगवंताला चिकटून राहिल्यावर समाधान कां राहतं ? तर तेथे मन कसं असतं ? प्रज्ञा कशी असते ? परमात्मा आनंदस्वरूप आहे. आनंदस्वरूप म्हणजे तरी कसा ?? तर आ+नंद. 'नंद' म्हणजे तृप्त होणे, आणि आ म्हणजे सर्व बाजूनें तृप्तता. आनंद म्हणजे शांतता. परमशांतता. भगवंताला चिकटून राहिल्यावर सर्व बाजूनी तृप्तता, अभय, संशयरहितता याचंच नाव समाधान, म्हणजेच अध्यात्म. आनंदघन भगवंताला सतत चिकटूनच नव्हे तर आनंदस्वरूप होण्याचे साधन - एकच एक साधन, श्रीगुरुंनी प्रसादपूर्वक दिलेल्या "नामा"चे स्मरण.

-- अण्णा

No comments: