17 January, 2008

संतांची कळकळ

संतांची कळकळ

कळकळीच्या दृष्टीने संतांचा नंबर सदा पहिला. हे स्वतः पूर्ण असतात. जगत् कल्याणासाठी आपले सर्वस्व उदारतेने, करुणेने वाटत राहतात. अवघ्यांच्या हिताची, उद्धाराची तीव्र कळवळ त्यांच्या ठायी नांदते.

समोरच्यांच्या कमी-जास्त अधिकाराचा कोणताही विचार न करता त्यांच्याच परम कल्यासाठी त्यांच्याच पायां पडतात. कोण ? तर फक्त संतच. अजून उपकार तो कोणता असावा ? यापरती अजून कळवळ ती काय असावी नां ? सगळ्यांना दंडवत घालण्यांतही कळकळ आणि प्रसंगी शिव्या घालण्यांतही एक तोच कळवळा.

संतांना माऊलीची उपमा देतात. "लेकुराचे हित । जाणे माऊलीचे चित्त ॥". "ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥ पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥

खरे सांगू का ? व्यवहारांतील हा माऊलीचा दृष्टांतसुद्धां कमीच पडतो. संताच्या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी आईच्या प्रेमाची उपमा तोकडीच आहे. कळवळ्याच्या बाबती संत व आई एकाच जातीचे आहेत, पण " करी लाभाविण प्रीति " ही फक्त संतप्रेमाचीच विशेषता आहे.

रामायणांत तुलसीदासांनी भरत व हनुमान यांना संत म्हटले आहे. प्रभू रामरायांना ज्या कैकयीने वनवासास पाठविले, अशा मातेलाही चित्रकूट यात्रेच्या निमित्ताने, श्रीरामाच्या पायावर घालण्याचे काम एका भरतानेच केलेले आहे.

रामायणांत एक प्रसंग आहे. मारुतीराय वानरांना घेऊन सीतामाईच्या शोधासाठी निघाले, तेव्हां एका प्रसंगी सर्वजण तहानेने व्याकूळ झाले व पाणी लवकर मिळाले नाही तर वानरांचे प्राणोत्क्रमण होणार अशी अवस्था झाली. संतवृत्तीचे, कृपावृत्तीचे बलभीम, त्यांना हे पाहवले नाही. "बुद्धिमतां वरिष्ठ" असणारे अंजनीसुत पाणी शोधण्यासाठी एका डोंगरावर चढले. तेव्हां त्यांना एक गुहा आढळली. त्यांतून पक्षी ये जा करीत होते. या वरून तेथे पाणी असले पाहिजे असे अनुमान त्यांनी केले. पण स्वतः एकटे जाऊन पाणी पिऊन आले नाहीत. डोंगरावरून खाली आले, सर्व वानरांना घेऊन वर गेले, सर्वांची तहान भागवली व मगच स्वतः पाणी प्याले. तसेच संत ! भगवत् साक्षात्काराच्या प्राप्तीवर आरूढ होऊनही समाजाच्या कल्याणासाठी परत खाली येतात. संतस्वरूप हनुमंतांनी भित्र्या सुग्रीवाचा संबंध रामाशी जुळवून त्याला निर्भय केले. मारुतीरायांना काय लाभ हवा होता ? "कशी लाभाविण प्रीति" हेच.

कळकळीमुळे संत अत्यंत थोर अशा आत्मीयतेने कशी जवळीक करतात पहा ! श्रीतुकोबारायांचा एक अभंग आहे. "अर्भकाचे साठी । पंते होती धरिली पाटी ॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगी ॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाऊल घाली । तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठांव ॥ " पाटी हाती धरण्याची गरज नसतांना सुद्धां मुलाला लिहितां यावे म्हणून पंत हाती पाटी धरतात. आईला चांगले भरभर चालतां येत असतांनाही बालकाला चांगले चालता यावे म्हणून जाणून बुजून आई त्याच्या चालीने चालते. नाव लोकांना तरून पलीकडे नेण्यासाठी पाण्यात राहते. तसेच संत पूर्णत्वाच्या स्थितीवर असूनही, कळवळ्यापोटी क्रिया (कर्म) करून दाखवतात. जगासाठी ह्या भवसागरांत नावेचे काम करतात.

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती । तेथे कर माझे जुळती ॥" संतांच्या उपकाराचे काय वर्णन करणार ? नारदांनी भक्तिसूत्रांत त्यांचे असेंच वर्णन केले आहे. " स तरति , स तरति । स लोकान् तारयति ॥". कांही कर्तव्य प्राप्तव्य नाही. पण आहे तो एक फक्त असीम असा कळवळा, कळकळ. आपल्याला फोडण्या तोडण्यासाठी आलेल्या लोखंडालाही सुवर्णत्वाचा लाभ करून देणारी एकच कृपाळू उदार दृष्टी.
अण्णा -

No comments: