03 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७४

श्लोक ७४
मनोजवस्तीर्थकरो  वसुरेताः वसुप्रदः 
वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाः हविः  ।।
(६९) मनोजवः :  - ज्याचे चलनवलन मनोवेगाने होते असा. तो आपल्या भक्तांचे दुःख व अज्ञान नाहीसे करण्याकरतां अत्यंत आतुरतेनें व वेगाने हालचाल करतो. तो सर्वव्यापी असल्याने [1]सर्वापक्षा अत्यंत वेगवान आहे. जे त्याच्या मागे लागतात त्यांना तो सापडत नाही. मन बुद्धि ही त्याच्याच मुळे गतीमान आहेत. त्यामुळे इंद्रिये मन बुद्धि जेथपर्यंत जातात तेथे तो परमात्मा आधीच अस्तित्व (सत्)रूपाने आहे.
(६९) तीर्थकरः :  - तीर्थांचा आचार्य. ज्ञानदाता. तीर्थ म्हणजे विद्या. श्री नारायण सर्वज्ञान विज्ञानाचा दाता आहे म्हणून सर्व विद्या तंत्रांचा तो प्राचीन आचार्य आहे.
(६९) वसुरेताः :  - ज्याचे वीर्य सुवर्णमय आहे असा. उप्तत्तीचे सुरवातीस परमेश्वराने जलाची उप्तत्ती केली व त्यामध्ये आपले वीर्य सोडले. त्यापासून एक सुवर्णमय अंडे निर्माण झाले. त्यातूनच सृष्टिकर्ता ब्रह्मदेव उप्तन्न झाला. म्हणूनच त्या सृष्टिकर्त्या परमेश्वरास पुराणांनी 'हिरण्यगर्भ' म्हटले आहे.
(६९) वसुप्रदः :  - सर्व वैभव विपुलतेने देणारा. या ठिकाणी 'वसु' या शद्बाचा अर्थ लौकीक संपत्ती, पैसा, स्थावर जंगम मिळकत, धनधान्य संतती वगैरे. श्रीविष्णु आपली सहचारिणी श्रीलक्ष्मी हिच्या सहाय्याने आपल्या भक्तांचे व इतर प्राणी मात्रांचे भरण पोषण करतो. त्यांना विपूल संपत्ती प्रदान करतो.
(६९) वसुप्रदः :  - येथे ही संज्ञा द्विरूक्त झाली आहे परंतु या ठिकाणी वसु म्हणजे मोक्ष संपत्ती. व ती सर्वश्रेष्ठ संपत्ती तो ज्यांची निवड करतो त्यांनाच मिळते.
(६९) वासुदेवः :  - वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण. किवा जो वसुही आहे व देवही आहे असा. 'वासु' म्हणजे सर्व [2]प्राणीमात्रांमध्ये जीवरूपाने जो वस्ती करतो व देव म्हणजे आनंदित करतो तो. अर्थातच ही संज्ञा भगवान श्रीकृष्णास यथार्थतेने लागू होते. कारण तोच जीव रूपाने सर्वांतर्यामी राहून आनंद निर्माण करतो.
(६९) वसुः :  - सर्वांचे वसतीस्थान. आधार. तो सर्वांचे ठिकाणी रहातो परंतु मायेने म्हणजेच मनाने आवृत्त झालेला आहे. हे मनच सर्व प्राणीमात्रांत जड-चेतन विचार-भावनांचा खेळ मांडते. आत्मप्रकाशाच्या आधारावर हा सावल्यांचा खेळ चाललेला आहे. गीतेमध्ये [3]भगवंत सांगतात, 'मीच सर्व जीवांचा आदी, मध्य व अंत आहे.' अर्थात् तोच सर्व जीवांचा आश्रय आहे. त्याचे वाचून अस्तित्वच नाही. 'माझे मधूनच सर्व प्रकट झाले आहे,माझ्यामध्येच स्थित आहे, व माझ्यामध्येच परत विराम पावते.''
(६९) वसुमनाः :  - या जगतातील सर्व प्राणीमात्रांमध्ये, वस्तुंमध्ये सतत 'अस्तित्व रूपाने' स्थित होऊन त्याचेकडे लक्ष (मन) पुरवितो तो श्रीविष्णु 'वसुमना' आहे, नित्य आहे.
(६९) हविः :  - समर्पण. जे त्याला समर्पण केले जाते ते त्याचेच स्वरूप असते. त्याचे वाचून दुसरे काहीच असू [4]शकत नाही. सर्वकाली सर्व ठिकाणी तोच आहे म्हणून गीतेमध्येही भगवंत म्हणतात सर्व हवि ब्रह्मच आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]  अनेजदेकं मनसोजवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् । तद्धावतोऽन्यानत्येति (इशावास्य) 
[2] ईश्वरः सर्व भूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूदानि मायया ।। (गीता १८-६१) – ईश्वराचे वास्तव्य सर्व जीवांच्या हृदयात आहे. हे अर्जुन ! तो आपल्या मायेने सर्व जीवांना यंत्रात बसविल्याप्र्माणे फिरवितो.  
[3] अहमात्मागुडाकेश सर्वभूताशयस्थितः  । अहमादिश्च मध्यंच भूतानामन्त एवच  ।। गीता १०-२०
[4]    ब्रह्मापर्णं ब्रह्म हविर्ब्रह्मग्नौ ब्रह्मणा हुतम्  । गीता ४-२४

No comments: