29 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८३

श्लोक ८३
समावर्तोऽनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः ।
दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा  ।।
(७७) समावर्त :  - कुशलतेने सम्यक आवर्तन करणारा. आवर्तन म्हणजे फिरविणे. संसारचक्राचे (जीवनचक्राचे) योग्यतर्‍हेने आवर्तन करणारा. जन्ममृत्यूचे सतत फिरणारे चक्र म्हणजेच संसारचक्र व ते चक्र ज्या नियमांनी फिरते तो नियम दुसरे कोणी नसून स्वतः भगवंतच आहे. तो नियम त्या नियमांचा कर्ता भगवंत श्रीनारायणच आहे.
(७७) निवृत्तात्मा :  - ज्याचे मन इंद्रिय विषयांच्या आसक्तिमधून निवृत्त झाले आहे असा. मुंडकोपनिषदांतील दोन पक्ष्यांच्या सुप्रसिद्ध रूपकाची येथे आठवण येते. अत्यंत निकटचे सख्यत्व असलेले दोन पक्षी एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत. पैकी एक झाडाची फळे आवडीने खात आहे व दुसरा न खांताच निरिक्षण करत आहे. त्या पैकी दुसरा निवृत्तात्मा आहे. काही टिकाकार या संज्ञेची फोड 'अ-निवृत्तात्मा' अशी करतात. त्याप्रमाणे अर्थ होईल जो कधीही कशातूनही निवृत्त होत नाही, परंतु प्रत्येकात  समाविष्ट होतो असा. आत्माच सर्व आहे, सर्व प्राणीमात्र तोच आहे, तोच परमात्मा श्रीनारायण आहे.
(७७) दुर्जयः :  - अजिंक्य. जो कोणाकडूनही जिंकला जात नाही असा. आपल्या पैकी बहुतेक व्यक्तींमध्ये सामान्य वासनांचे प्राबल्य असले तरी हळूहळूं कालगतीमुळे शेवटी उन्नत ध्येय विचार प्रबल होऊ लागतात आणि आपण अवशतेनें परमात्म्याकडे ढकलले जातो. कित्येकवेळां लढाईमध्ये हार खावी लागते परंतु युद्धातील अंतिम विजय मात्र आपल्या हृदयातील भगवंताचाच असतो.
(७७) दुरतिक्रमः :  - ज्याची कधीच अवज्ञा करतां येत नांही असा. पूर्ण वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित अशा विश्वाचे निरिक्षण केले असता. जे सत्य प्रतीत झाले त्याच्याच निर्देश या संज्ञे मध्ये केला आहे. व ते सत्य आहे की कुठलाही जीव अगर वस्तू त्या भगवंताची आज्ञा मोडण्याचे धाडस करूं शकत नाही.  [1]कठोपनिषदामध्ये ऋषी म्हणतात, त्याच्याच भयानें अग्नि प्रज्वलित होतो त्याच्याच भयानें सूर्य प्रकाशतो, इंद्र व वायु त्याच्याच भयाने आपापली कामे करतात व पांचवा मृत्युही त्याच्याच भयाने धावतो (कार्य करतो). जणू कांही त्यानें प्रत्येकांचे मागे वज्र उगारलेले आहे. अतिक्रम म्हणजे ओलांडून जाणे. अर्थात् दुरतिक्रम म्हणजेच ज्या अवस्थेच्या पलिकडे कोणालाही जाता येणार नाही अशी अवस्था म्हणजेच श्रीनारायण. कारण तो सर्व उत्क्रांतीचे अंतिम व एकमेव ध्येय आहे. तो सर्वांच्या पलीकडील अंतिमसत्य असून त्याच्या पलीकडे प्राप्तकरून घेण्यासारखी कुठलीही अवस्था नाही.
(७७) दुर्लभः :  - अत्यंत परिश्रमाने ज्याची प्राप्ती होऊ शकते असा. आध्यात्मिक परिपूर्ण अवस्था, हे उत्क्रांतीचे ध्येय श्रीनारायणच आहे. हळूहळू होणार्‍या असंख्य उत्क्रांती नंतरच त्याची प्राप्ती होत असते. उत्क्रांतीमध्ये अत्यंत सूक्ष्म व नगण्य अशा एक पेशीय जीवापासून हळूहळू उत्क्रांत होत मनुष्याची अवस्था निर्माण झाली आहे व यापुढे मनुष्याची बौद्धिक उन्नत अवस्था म्हणजेच देवत्व होय. निरंतर व सतत केलेल्या प्रयत्नांचे फल म्हणूनच हे सुबुद्ध मनुषत्वाचे बक्षिस प्राण्यास प्रदान केले गेले आहे. त्यानंतर स्वार्थरहित सेवा बुद्धिने कर्म करणे, भावपूर्ण अंतःकरणाने भक्ति करणे, खूप खोल असे अध्यात्मिक ग्रथांचे अध्ययन करणे, यांचे सहाय्याने मनुष्य आपल्यातील लौकीक वासनांपासून स्वतःस परावृत्त करण्यास शिकतो व शेवटी प्रत्यक्ष प्रतीतीस येणारे दिव्य भगवत स्वरूप प्राप्त करतो. खरोखर नारायण स्वरूपाचा हा साक्षात्कार कष्ट साध्य असल्याने दुर्लभच आहे.
(७७) दुर्गमः :  - ज्याचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे असा.[2] भागवतात उल्लेख आहे की भगवंत प्राप्त करून घेणे अत्यंत सोपे आहे (अदुर्गम). ज्यानी समर्पित वृत्तीने अद्याप खोल ध्यान करण्याची पात्रता मिळवलेली नाही, आपल्या अंतःकरणाचा विकास केकेला नाही व शुद्धि प्राप्त केली नाही, ज्यांनी गुरुकडून अगर स्वतः शास्र वाचून केवळ ज्ञा मिळविले तरी अशा अपरिपक्व बुद्धिच्या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया होते की हे फारच कठीण आहे. परंतु तो जसजसा आपल्या साधनापथावरून पुढे जावू लागतो तसतसे त्याला मार्गदर्शन मिळते व ’पुढे चल’ अशी आणकीही पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते, एक उदार तेजस्वी चेहरा त्याच्या दृष्टोप्ततिस येतो आणि त्याचा कृपाळू, दयार्द्र प्रकाश त्याला सर्व अडजणी व संकटातून सुरक्षितपणे त्याच्या ध्येयाकडे नेतो. सामान्य दिव्याचा प्रकाश वाटसरूचा फारतर १५-२० फुटापर्यंतचा मार्ग प्रकाशित करूं शकतो. परंतु एकावेळेला १-२ मैलाचा मार्ग तो प्रकाशित करूं शकणारच नाही. तरीही त्याने मार्गक्रमणा सुरू केलीच पाहिजे व जितके दृष्टिपथात आहे तितके चालत राहिले पाहिजे. तो जसा पुढे जाईल तसा त्याचा पुढचा मार्ग प्रकाशित केला जातो.
(७७) दुर्गः :  - आंत प्रवेश करण्यास कठीण असा. संस्कृतमधील या संज्ञेचा अर्थ होतो अभेद्य किल्ला. व या अर्थानें असे सुचविले जाते की ते परमतत्व श्री नारायण प्राकृतिक आवरणाने व त्याच्या मोहमयी प्रभावाने झाकले गेले आहे व त्याच्याकडेच आकर्षित झाल्याकारणानें आपले सर्व लक्ष आवरणातील सुखसंवेदनेतच गुंतून राहिले आहे. ही आवरणांची भुलविणारी शक्ति म्हणजेच बलवान माया होय. फारच थोडे धैर्यवान व कृपाप्राप्त लोक तिच्या पलीकडे जा शकतात. भगवंत स्वतःच गीतेत म्हणतात, ' माझी माया ओलांडून जाणे कठीण आहे. 'मम माया दुरत्यया ।' उपनिषदे म्हणतात, 'ते परमसत्य नारायण कुठल्याही इंद्रियांनी जाणले जावू शकत नाही, मनाच्या कल्पनेनें त्याचे आकलन होत नाही किवा बुद्धिच्या तर्कानेंही तो समजत नाही. ही सर्व आपल्या ज्ञानाची साधने आहेत.व त्यांना सत्यज्ञान होणे अगदी अशक्य आहे. जेव्हा कोणी एखादाच आपले प्राण पणाला लावून त्या आवरणांवर हल्ला करतो तेंव्हाच तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जो बहिर्मुख आहे त्याला ते परमपद एकाद्या दुर्भेद्य किल्ल्याप्रमाणे भासते. या संज्ञेचा सरळ अर्थ, आपल्या अंतर्यामी असलेला श्रीनारायण आपल्याला सहजतेने ज्ञात होणार नाही.
(७८०) दुरावासः :  - ज्या ठिकाणी वास करणे, रहाणे सुलभ नाही असा. अत्यंत प्रामाणिकपणे व सतत प्रयत्न करणार्‍या महान् साधकाच्याही हृदयांत तो स्थिरतेने स्थापित झालेला आढळत नाही. कारण सुखसाधन असलेल्या विषयांपासून मन परावृत्त करणे व चैतन्याचा ध्यास घेऊन तिथेच स्थिर रहाणे ही गोष्ट बिलकुल सोपी नाही. योगी साधकांनाही अत्यंत नेटाने केलेल्या ध्यानांतही त्या नारायणांस स्थिरतेनें धरून ठेवणे कठीण भासते म्हणूनच त्यास 'दुरावास' ही संज्ञा प्राप्त झाली आहे. म्हणूनच गीतेमध्ये अर्जुन अत्यंत विषादाने म्हणतो, 'मन अत्यंत चंचल असल्यानें हे मधुसूदना, हा जो तू समत्वाचा योग सांगीतलास तो आचरण्यास, मनांत स्थिर करण्यास अत्यंत कठीण आहे. आणि भगवंतही त्याच अध्यायांत सांगतात की निर्वात स्थळीच्या दिव्याप्रमाणे अगदी न हलणारे स्थिर असे ध्यान असले पाहिजे.
(७८) दुरारिहा :  - असुर, दुष्प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करणारा. आपल्यातही जे कोणी आपला चांगुलपणा स्थिर करू शकत नाहीत त्यांच्या दुष्टपणाचा नाश तो भगवंत कृपामय असल्यानें करतो आणि त्यांना दुष्कृत्यांच्या वाईट परिणामांपासून वाचवितो. प्रत्येक साधकाच्या अंतःकरणांत असुर-दुष्ट प्रवृत्ती असतातच. परंतु भक्तिने त्याला आवाहन केल्यास तो अंतःकरणातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट करून टाकतो. त्यामूळे त्याला दुरारिहा ही सार्थ संज्ञा मिळाली. 
डॉ. सौ. उषा गुणे.



   द्वा सुपर्णासयुजा सखया समानं वृक्षं परिषस्वजातं ।
    तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति । मुंडक ३-१ ।।
[1]   भयादस्याग्निस्तपतिभयात्तपति सूर्यः  । भयादिंद्रश्च वायुश्चमृत्युर्धावतिपंचमः ।। कंठोपनिषद २-३-३
[2]   दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति । कठोपनिषत् १.३.१४
   यथा दीपो निवातस्थोनेङ्गते सोपमा स्मृतः  योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः (गीता ६.१९)

No comments: