23 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८१

श्लोक ८१
तेजोवृषो द्युतिधरः सर्वशस्रभृतांवरः 
प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकश्रृंगो गदाग्रजः  ।।
(७५) तेजोवृषः :  - जो तेजाचा वर्षाव करतो तो. बाह्य जगतात सूर्यच तेज उष्णता देतो त्यामुळे पाउस पडतो व त्यातूनच कृषी शक्य आहे. जरी प्रत्यक्ष सूर्य त्यात भाग घेत नाही तरी कार्यकारण भावानें तोच कर्ता म्हणविला जातो. त्याच प्रमाणे केवळ आपल्या अस्तित्वानें प्रत्येक प्राणीमात्रांचे अनुभव प्रकाशित करणारा श्रीनारायण आहे तोच आत्मस्वरूपानें तेजाचा वर्षाव करणारा आहे.
(७५) द्युतिधरः :  - द्युति या शद्बानें सौंदर्यातील तेजस्विता व आकारातील सामर्थ्य निर्देशित केले जाते. म्हणून या संज्ञेचा अर्थ होइल ज्यानें दिव्य आकार धारण केला आहे तो. तसेच ही संज्ञा सुचविते की शुद्ध जाणीव हीच तेजाला प्रकाशाला धारण करणारी असते व याच आत्मप्रकाशामुळे जीवांना आपल्या संवेदना, भावना व विचार यांचे ज्ञान होते.
(७५) सर्वशस्रभृतांवरः :  - शस्र चालविणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ. पुराणांमध्ये नारायणाचे वर्णन सुदर्शन चक्रधारी असे केलेले आहे. सुदर्शन चक्र हे सर्वात्कृष्ठ शस्र असल्याने ही संज्ञा त्याला योग्यच ठरते. पण तो आपले शस्र अविवेकाने कधीच चालवित नाही कारण त्याचे प्रत्येक कार्य न्यायपूर्ण असते. निसर्गामधील प्रत्येक विध्वंस हा 'विधायक विध्वंस' या स्वरूपाचा असतो म्हणूनच नारायणाच्या शस्त्रास 'सु-दर्शन' असे म्हटले आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये पूर्णता येत असतांना हळूहळू पण अनिवार्यपणे साधकाला उमजू लागते की त्याच्या अंतर्यामी राहून कोणीतरी त्याचे बाह्य जगताचे संबंध नष्ठ करीत आहे व उच्चतर अवस्थेकडे जाण्यास भाग पाडीत आहे. आपले पौराणिक वाङ्‌मय अशा उदाहरणांनी परिपूर्ण आहे. व त्या सर्व ठिकाणी श्रीनारायण आपले सुदर्शन मनुष्याच्या दुष्ट प्रवृत्ती विरूद्ध चालवितो व त्याला मोक्ष प्रदान करतो. म्हणजेच दिव्यदृष्टि सुदर्शन देतो. इतर लोक ज्यावेळी संहार करतात तेंव्हा तो केवळ विघातक असल्यानें दुःखदायक असतो. परंतु भगवंताचा संहार विधायक असल्यानें तो शस्र धारण करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ आहे हे साधकाच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे.
(७६०) प्रग्रहः :  - जगातील कुठल्याही जातीधर्माच्या, कुठल्याही भक्तानें, केव्हांही केलेली प्रार्थना पूजा ग्रहण करण्यास सर्वथैव योग्य असा तो श्री नारायण प्रग्रह आहे. भक्त स्वतःच्या संप्रदायाप्रमाणे त्याच्या संस्थामधून सुचविल्याप्रमाणे प्रतिकांमार्फत अगर धर्मग्रथांच्या आदेशानूसार भगवंताला आवाहन करीत असतो. तो कुणीही असला तरी तो जेव्हा आपल्या शरीर, बुद्धि, मन इत्यादि साधनांच्या पलीकडे जातो तेंव्हा त्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो तो सर्वत्रिक व एकच स्वरूपाचा असतो. तो असतो परमात्म्याच्या व्यापकतेचा व नित्यतेचा. श्रीनारायणच आत्मस्वरूप असल्यानें तो सर्वत्र पूजा प्रार्थना ग्रहण करणारा आहे मग ती प्रार्थना करणारा मनुष्य असो, इतर प्राणी असोत वा वनस्पती असोत, त्यांनी केलेली प्रार्थना समजून केलेली असो वा नसो ती प्रार्थना तो ग्रहण करतो म्हणून तो 'प्रग्रह'.
     तसेच प्रग्रह या संस्कृत शद्बाचा अर्थ होतो 'लगाम'. ज्याच्यामुळे घोडयावर नियंत्रण ठेवता येते. यादृष्टिने विचार करू लागल्यावर आपल्या डोळयापुढे ताबडतोब उपनिषदांतील रूपक येते. या रूपकामध्ये मनाला लगामांची उपमा दिलेली आहे व हे लगाम इंद्रियांचे बलवान् लढाउ घोडे आवरून धरतात, नियमित करतात. येथे भगवंतालाच 'प्रग्रह' म्हणून आवाहन केले आहे. मग भक्तांना आपली इंद्रिये नियमित करण्याकरतां वेगळी खटपट करावी लागतच नाही. भक्ताचे मन भगवंताच्या पायाशी भक्तिनें लीन झालेले असले म्हणजे भगवंत स्वतःच आपल्या सामर्थ्यानें पण भक्ताला नकळत हे कार्य आपल्या भक्तांकरतां करत असतो, म्हणूनच खरा भक्त अनन्य होऊन भगवंताला शरण जातो व आपल्या मन इंद्रियांना आवरण्याची विनंती करतो.
(७६) निग्रहः :  - नष्ट करणारा. नाश करणारा भगवंत. ह्या कल्पनेचा अपरिपक्व विद्यार्थ्यास धक्काच बसेल! परंतु ते खरे आहे. फरक इतकाच आहे की तो 'अहंकार ' नष्ट करणारा देव आहे. ज्याप्रमाणे एकादा डॉक्टर रोग नष्ट करतो, सूर्य अंधःकार नष्ट करतो, किवा ग्रीष्म ऋतु थंडी नष्ट करतो तसा तो अहंकार नष्ट करतो. व त्याच बरोबर साधकाचे अहंकेंद्रित विकार, मर्यादा नाहीशा करतो. ही संस्कृत संज्ञा सुचविते की तो भगवंत आपल्या भक्ताला स्वतःमध्ये पूर्णतः सामावून घेतो. (निःशेष ग्रहणम्) एकादा भक्त आपले लौकीकामध्ये पूर्ण आसक्त झालेले मन त्या जगापासून निवृत्त करून जेव्हा थोडेसे तरी स्वस्वरूपाकडे वळवायचा प्रयत्न करतो तेंव्हा तो भगवंत भक्ताचे मन स्वतःच्या सौंदर्याकडे व सामर्थ्यामध्ये जास्त जास्त रमवायचा प्रयत्न करतो व शेवटी त्या व्यक्तिला शुद्ध चैतन्यामध्ये पूर्णपणे विलीन (नि-ग्रह) करून घेतो.
(७६) व्यग्रः :  - जो सतत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यांत गुंतला आहे असा. मनुष्याच्या मनांत जेव्हा अपूर्णता असते तेंव्हा इच्छा उत्पन्न होते. भगवान श्रीनारायणाचे रूप परमशांत व आनंदपूर्ण आहे. त्यामुळे तेथे कुठलीच अशांतता नाही कारण मुळात कुठलीच इच्छा नाही, तो मात्र इच्छापूर्ती करण्यात व्यग्र आहे.
(७६) नैकश्रृंगः :  - ज्याला अनेक शिंगे आहेत असा. आधुनिक विचारांच्या विद्यार्थ्याला अनेक शिंग असलेला देव ही कल्पनाच मोठी विलक्षण व हास्यास्पदही वाटेल व त्याची पूजा करणे त्याहून मूर्खपणाचे वाटेल. त्याला तीन पाय आहेत हे वाचून तर आश्चर्याने तो थक्कच होऊन जाईल. (चत्वारो शृंगाः त्रयोअस्य पादाः) ( महा उप.) परंतु ही साहित्यिक कल्पना त्याला धक्का देउ शकली तर त्याची बुद्धि आणखी खोल विचारणा करू लागते. ही चार शिंगे म्हणजे जाणीवेच्या चार अवस्था आहेत. व त्या म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या. तुर्या अवस्थाही शुद्ध जाणीवेची अवस्था होय. तीन पाय म्हणजे जाणीवेच्या स्थूल - सुक्ष्म - कारणदेह या तीन अवस्था ज्याच्यामध्ये आपणसध्या भटकत आहोत.
(७६) गदाग्रजः :  - गदाचा मोठा भाऊ. 'गद' नावाचा श्री कृष्णाचा एक धाकटा भाऊ होता. तसेच गद म्हणजे मंत्र. (गायते इति गदः) व ते मंत्र म्हटले जातात. टिकाकार सांगतात 'निगद' म्हणजे मंत्र परंतु त्यातील 'नि' हे उपपद जाऊन नुसते 'गद' राहिले त्याचाही अर्थ होतो 'मंत्र' म्हणून 'गदाग्रज' या संज्ञेचा अर्थ होईल त्याचे मंत्राने आवाहन केले जाते किवा जो मंत्राने प्रसन्न होतो तो.
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: