17 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७९

श्लोक ७९
सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनाङगदी ।
वीरहा विषमः शून्यो घृताशीरचलश्चलः  ।।
(७३) सुवर्णवर्णः :  - सोन्याचा वर्ण असलेला - श्रीनारायण. भक्तांच्या हृदयांत आत्मस्वरूपाने विराजमान असतो व सर्व प्रकाशित करणारा सर्वसाक्षी असतो. म्हणून सुवर्णवर्ण असलेला असा द्रष्ट्यास भासमान होतो. मुण्डक उपनिषद् म्हणते[1] - त्या स्वयंप्रकाशी आत्मतत्वाचा, सुवर्णवर्णाचा साक्षात्कार झाल्यावर साधकाचे ज्ञान पूर्ण परिवर्तित होते. त्यानंतर तो ज्ञानी पुरूष सर्व गुणदोषयुक्त कर्मांचा त्याग करून अत्यंत शुद्ध निष्कलंक होतो, व परमशांतीची अवस्था प्राप्त करतो.
(७३) हेमांगः :  - ज्याची अंगे सुवर्णमय आहेत असा. 'सूर्यमंडल मध्यवर्ती' असे जे भगवंताचे वर्णन केलेले आहे ते प्रसिद्धच आहे. त्यालाच सूर्याच्या तेजामधून प्रतीत होणारा हिरण्मयपुरूष असेही त्यास म्हटले जाते. श्रुतिमध्येही म्हटले आहे. [2]'सूर्याचे मंडलामध्ये स्थित असलेला, व सुवर्णकांती असलेला पुरूष' त्याच उपनिषदांत पुढे म्हटले आहे. 'मन ब्रह्म आहे व सूर्यब्रह्म आहे.' परब्रह्मस्वरूप असलेला श्रीहरीच सूर्यामधून कार्य करत असतो. (सूर्य नारायण) म्हणून ही संज्ञा अगदी सार्थ आहे.
(७३) वराड्गः :  - वर म्हणजे मनोहारी. म्हणून अत्यंत सुंदर अंगे असलेला तो वरांग. श्री नारायण सुंदर अंगे (रूप) असलेला असा असल्यानें भक्तिमार्गातील योग्यांचे हृदय हरण करणारा आहे असेही त्याचे वर्णन केले जाते.
(७४०) चंदनाङ्गदी :  - ही संज्ञा दोन पदांनी तयार झालेली आहे. (१) चंदन - आनंद देणारे (२) अंगदी - बाहुभूषणे. दोन्हीचा मिळून अर्थ होईल ज्याची बाहुभूषणे अत्यंत आकर्षक आहेत असा. किवा दुसरा अर्थ ज्याचे अंग चंदन चर्चित आहे असा.
(७४) वीरहा :  - वीरांचा, उन्मतांचा नाश करणारा. सज्जनांचे रक्षण करण्याकरतां भगवंत अनेक अवतार धारण करतो व थरकांप उडविणार्‍या भयंकर व उद्दाम असूरांचा युद्धात नाश करतो. दुसरा अर्थ होईल अत्यंत शक्तिशाली अशा रागद्वेषादि द्वंद्वे नष्ट करणारा. आपल्याच हृदयांत ते विकारांच्या रूपानें ठाण मांडून बसलेले असतात.
(७४) विषमः :  - ज्याच्या समान कोणीही नाही असा. भगवत् गीतेमध्ये अर्जुन विश्वरूप पाहून आपल्या अनुभवाचे [3]विवेचन करतांना म्हणतो, ' तुझ्यासमान कोणीही अस्तित्वातच नाही तर तुझ्याहून श्रेष्ठ ह्या तीन्ही लोकांत कोण असूं शकेल ? तू तर केवळ अप्रतिम शौर्य असलेला आहेस.
(७४) शून्यः :  - 'कांहीही नसणे' असा. ह्या ठिकाणी 'अस्तित्व नाही' अशा तीन अवस्था आहेत. त्या म्हणजे जेथे (अ) अनुभवांची साधने शरीर मन बुद्धि यांचा अभाव आहे. (आ) जेथे विषय, भावना, विचार या तीन अनुभव क्षेत्रांचा अभाव आहे. (ई) जेथे अनुभवणारा ज्ञाता द्रष्टा अनुभविक, विचारक हया कुठल्याही भूमिकेत नसतो अशा अवस्था. शुद्ध आत्मतत्वामध्ये या तीनही (अ, आ व ई) अवस्थांचा पूर्ण अभाव असतो. श्रीहरीचे भक्त या तीनही अवस्था ओलांडून पलीकडे जातात. त्या अनंताचे विशुद्ध स्वरूप कुठल्याही गुण, उपाधि विरहित असे असते म्हणूनच त्याला शून्य असे म्हटले आहे. परंतु हे शून्यत्व म्हणजे बुद्धानी प्रतिपादित केलेले 'अन्-अस्तित्व' नव्हे. विषय-भावना-विचारातीत अशी शून्यावस्था म्हणजेच शुद्ध सत्‌स्वरूप आत्मा श्रीनारायण.
(७४) घृताशीः :  - ज्याला इतरांचेकडून कुठल्याही आशीर्वादाची अपेक्षा नाही असा. ते परब्रह्म परिपूर्ण सर्व कामनांच्या पलीकडे असल्यानें जगातील कुठल्याही वस्तूनें त्याला परिपूर्णता यावी अशी स्थिती नाही. अपूर्णतेची भावना खरोखर सर्व वासनांना जन्म देते, व पूर्ततेकरतां प्रयत्न करावयांस लावते. पण तो स्वतःच परिपूर्ण आहे म्हणून 'घृताशी' आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल, ज्याने वृंदावनातील गवळयांच्या घरातील चोरून आणलेले तूप खाऊन टाकले असा.
(७४) अचलः :  - न हलणारा. तो आपल्या स्थानापासून कधीही पतित होत नाही. त्यामुळेच आपल्या शाश्वत स्वरूपापासून कधी हलत नाही असा. दुसरा अर्थ होईल तो परमात्मा सर्वव्यापी असल्यानें त्याला हलण्यास कुठेच मोकळा अवकाश नाही. सर्वत्र सर्ववेळी तो उपस्थित आहेच.
(७४) चलः :  - हलणारा. यापूर्वीची व ही संज्ञा एका पुढे एक मांडून आपल्याला असे सुचविले आहे की द्वैताने किवा अनेकतेने भरलेले जग आपल्या अनुभव साधनांना सतत बदलतांना दिसत असले तरी ते त्या अचल परमात्म्याचेच एक बाह्य रूप आहे. शरीर मन बुद्धि यांच्या निरपेक्ष अवस्थेत अनंत परमात्म्याचा अनुभव 'अचल' असा आहे, तर साधनांच्या सापेक्ष भूमिकेमध्ये तो 'चल' आहे असे भासते. या संबंधात आपण पूर्वी विवेचन केलेले आहेच. जेव्हा एकादा प्रवासी गतीमान वाहनातून प्रवास करत असतो तेंव्हा तो 'अचल' असला तरी वाहनानें मर्यादित असल्याने 'चल' भासतो त्याप्रमाणे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   यदा पश्यः पश्यते रुक्मवर्णम् । (मुंडक उप. ५.३)
[2]  य एषोऽन्तरादित्ये हिरण्मयः पुरुषो दृश्यते । (छांदोग्य १.६.६.) आदित्यो ब्रह्मेत्यादेशः । (छांदोग्य ८-१०), मनो ब्रह्मेत्युपासीत । (छांदोग्य ३-१८-१९)
[3]  नत्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभावः  ।।

No comments: