14 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७८

श्लोक ७८
एको नैकः सवः कः की यत्तत्पदमनुत्तमम् 
लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः  ।।
(७२) एकः :  - एकमेव. ज्यास दुसरा नाही असा. त्या अनंतास कुठलाही भेद अगर [1]मर्यादा नसल्यानें ते ब्रह्म एकच, अद्वितीय आहे.
(७२) नैकः :  - अनेक. तो जरी एकच आहे तरी सर्व जीवांच्या अंतर्यामी तोच क्रिडा करतो. जसे आपण व्यक्तिरूपानें एकेकच आहोत परंतु आपले विचार अनेक आहेत, त्याचप्रमाणे तो परमात्मा, श्रीनारायण एकच असूनही प्रतिबिंबरूपाने असंख्य जीवांच्या मन बुद्धि अंतःकरणातून क्रिडा करत असतो. अशातर्‍हेने जगतातील विविध आकारातून प्रकट होत असल्यानें तो 'न-एक' म्हणजेच अनेक होऊन व्यक्त होतो. त्याचवेळी 'एक' ही त्याची व्याख्या आहे स्वरूप आहे. परंतु भगवंत कधीही व्याख्येने सांगता येत नाही. तो गुणरहित (निर्गुण) असल्याने वर्णनातीत आहे. म्हणूनच आपल्या शिष्यास परब्रह्माचे स्वरूप समजावून सांगतानां श्रीगुरू प्रथमतः 'ज्या मध्ये विविधतेचा लय होतो असे ते एक आहे' असे सांगतात. व लगेचच 'तो एक नाही' असेही सांगतात. त्याचे 'एकत्व' जाणणे म्हणजेच त्याचे सत्यस्वरूप जाणणे (अनुभवणे) हे बुद्धिपलीकडील अवस्थेमध्येच शक्य आहे. एकत्व हे अनेकत्वाच्या संदर्भातच (बुद्धि) जाणू शकते. एक ही सापेक्ष संज्ञा आहे. त्या अनंताचे स्वरूप केवळ ते स्वतःच होण्याने' जाणले जाते, बुद्धिने, ज्ञानाने जाणता येत नाही हे स्पष्ट करण्याकरतां आचार्यांनी ते एकही नाही (नैक) असा प्रतिषेध केला आहे. श्रुतिमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, तो परमात्मा आपल्या मायेने अनेक रूपे धारण करतो.[2]
(७२) सवः :  - जो यज्ञस्वरूप आहे असा. ज्या यज्ञामध्ये सोमरस काढला जातो त्याला 'सव' असे म्हणतात.
(७२) कः :  - सुख स्वरूप. ज्याचे स्वरूप सुखरूप आहे असा. शरीर, मन, बुद्धि ही दुःखाचीच स्थाने आहेत व जेव्हा त्यापलीकडे जाता येतें तेंव्हाच त्याचे सुखरूपत्व अनुभवास येते. कः ही एक प्रश्नार्थक संज्ञा आहे. मनुष्याच्या बुद्धिला पडलेला हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे, परंतु त्याचे उत्तर मनुष्याला आपल्या बुद्धिनें मिळत नाही. परमात्मा केवळ बुद्धिच्या पलीकडे गेल्यानंतरच प्रतीत होतो. तो बुद्धिच्या व्यवहाराने कळत नाही.
(७२) कीं  :  - काय ? ते परब्रह्मच सर्व जीवांचे अंतिमस्थान गंतव्य आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलच सतत विचारणा केली पाहिजे आणि त्याचे रूप काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सत्य केवळ अशाच विचारणा व विवेक या ज्ञानप्रक्रियेनें जाणता येणे शक्य आहे, तोच सर्व प्रश्नांचे विशेषतः 'काय'? या प्रश्नाचे उत्तर असल्यानें त्यालाच ही संज्ञा दिली आहे.
(७३०) यत् : - 'जे', या सर्वनामाचा अर्थ होतो जे स्वतः सिद्ध आहे असे. म्हणूनच उपनिषदांमध्ये या संज्ञेचा अनेक- वेळां उपयोग केलेला दिसतो. 'यत्' हे सर्वनाम जे पूर्वी अस्तित्वात आहे त्याचाच निर्देश करते. अशाप्रकारे नित्य स्वतःसिद्ध परब्रह्म जे सत् असत् निरपेक्ष आहे त्याचाच या ठिकाणी 'यत्' (जे) या सर्वनामानी निर्देश केला आहे. व तो आहे श्री हरि.
(७३) तत् :  - ते” - सर्व उपनिषद वाङ्‌मयातून परब्रह्माचा उल्लेख 'तत्' या संज्ञेने केला आहे. महावाक्यापैकी एक 'तत् त्वं असि' या मध्येही त्याचाच निर्देश आहे. याठिकाणी 'ते ' म्हणजे ते सत्य ज्याचे ज्ञान अद्याप झालेले नाही परंतु आचार्यांनी केलेल्या विवेचनाचे श्रवण केले, जे ऐकले त्याचे मनन केले व सतत निदिध्यास केला तर 'ते' सत्य जाणता येते. [3]गीतेमध्ये भगवंत म्हणतात 'ॐ’ 'तत्' 'सत्' हे तीन ब्रह्माचे निर्देश आहेत, 'तत्' या शद्बाचा आणखी एक अर्थ जे विश्वाचे व्यापकतत्व वाढविते ते.[4]
(७३) पदमनुत्तमम् :  - अनुलनीय असे पूर्णतेची अवस्था. सत्याची सर्वश्रेष्ठ अवस्था. 'श्रीविष्णु' हेच ते पद आहे. तसेच तोच पथ (पद) आहे. चालणे (पद) तोच आहे व गंतव्यही (पद) तोच आहे.[5]
(७३) लोकबन्धुः :  - जगाचा मित्र. प्रत्येकजण त्याच्या अमर्याद प्रेमबंधनात बांधला गेला आहे. तो जगताचा पिता आहे. पित्यासारखा हितकर्ता व प्रेमकरणारा जीवाचा दुसरा कोणीही मित्र असत नाही. तो तर सर्व सजीव निर्जीवांचाही खरा प्रामाणिक मित्रही आहे. जीवाने विकारवश होऊन केलेल्या अपराधानें निर्माण झालेले दुःख नाहीसे करून त्याचा व जगाचा उद्धार करण्याचे कार्य तो (मित्र) करतो.
(७३) लोकनाथः :  - जगताचा स्वामी. किवा जगतातील सर्व जीव ज्याचेकडे आपल्या इच्छापूर्तीकरतां, व गरजांकरतां विनवणी करतात तो लोकनाथ होय. किंवा असाही अर्थ होतो की तो जगाचे वैभव वाढवितो म्हणूनही 'लोकनाथ' आहे. 'नाथ' या शद्बाचे इतरही अनेक अर्थ होतात; व सर्वच अर्थाने श्रीहरीचे वर्णन केले जाते. जसे की ज्याची स्तुती केली जाते, ज्याचेवर प्रेम केले जाते किवा जो दैदिप्यमान आहे अशा अनेक अर्थानें 'श्रीहरि' लोकांचा नाथ स्वामी आहे.
(७३) माधवः :  - मधुकुलांत जन्मलेला तो माधव. वैशाख हा महिना मधुमास - माधवमास म्हणून ओळखला जातो. या महिन्यांतील वसंताच्या सर्व सौंदर्याचे व वैभवाचे उगमस्थान आहे प्रत्यक्ष श्रीविष्णुभगवान.
(७३) भक्तवत्सलः :  - ज्याचे भक्तावरील प्रेम अगाध असते असा. तो नेहमीच आपल्या भक्तांचे बाबतीत क्षमाशील व अमर्याद दयाशील असतो.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1] एकमेवाद्वितीयम् । (छांदोग्य. उप. ६.२.१) सजातीय विजातीय व स्वगत भेद – हे तीन आहेत १) सजातीयभेद २) विजातीय भेद ३) स्वगतभेद
[2]   यतो 'वा इमानिभूतानि जायन्ते । ज्याचेपासून हे सर्व प्राणी जन्मले आहेत. किंवा 'यतो' वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥ (तैत्ति उप २.९.१)  
[3]  'तत् सत् इति ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः  । गीता १७-२३
[4]   तनोति इति तत् । तनु विस्तार-करणे च ॥
[5]    अनुत्तमांगतिम् ।

No comments: