11 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७७

श्लोक ७७
विश्वमूर्तिः  महामूर्तिः  दीप्तिमूर्तिः  अमूर्तिमान्  
अनेकमूर्तिरव्यक्तः  शतमूर्तिः शताननः  ।।
(७१) विश्वमूर्तिः :  - संपूर्ण विश्वरूपानें साकारलेला. संपूर्ण सृजन हेच त्याचे रूप आहे म्हणूनच त्याला विश्वरूप म्हटले आहे. सर्वस्थूलरूपातील विश्व हेच त्याचे दिव्य स्थूल रूप आहे.
(७१) महामूर्तिः :  - ज्याचे दिव्यरूप महान् आहे असा. भव्य शेषनागावर पहूडलेला व विविधतेची सृष्टि निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवाचा आधार असणारा तो नारायण महामूर्ती आहे. संपूर्ण विश्व व त्याला निर्माण करणारा ब्रह्मदेव हे त्याचे केवळ लहान अंश आहेत म्हणून तो परमात्मा महामूर्ती आहे.
(७१) दीप्तमूर्तिः :  - ज्याची मूर्ती अत्यंत दीप्तीमान्, तेजस्वी आहे असा. तो ज्ञानप्रकाश स्वरूप असल्यानें सर्वकाली सर्व अनुभव तोच प्रकाशित करतो. [1]भगवद् गीतेत संजय म्हणतो, 'जर आकाशांत हजारो सूर्य एकाच वेळी दीप्तीमान झाले तर जे तेज निर्माण होईल असे तेज त्या परमात्म्याचे होते.
(७२०) अमूर्तिमान् :  - ज्याला कुठलाही आकार नाही असा. जरी त्याचे विश्वमूर्ति, महामूर्ति किवा दीप्तमूर्ति विश्वरूप असे वर्णन केलेले असले तरी वास्तवात त्याला कुठलाही आकार नाही म्हणून तो अमूर्तिमान् आहे. तो सर्वांस व्यापून आहे परंतु त्याला मर्यादा घालूं शकेल असे कांही नाही. जे मर्यादित आहे त्यालाच आकार असूं शकतो. अंतरिक्षाला ज्याप्रमाणे मर्यादा नाहीत म्हणून त्याला आकार नाही तद्वत तोही निराकार आहे. ते अनंत परमतत्व सूक्ष्माहून सूक्ष्म सूक्ष्मतर आहे त्यामुळे श्रीनारायणच आत्मरूपाने सर्वांना स्वतःमध्ये सामावून घेतो परंतु तो मात्र त्यातील कशानेही मर्यादित होत नाही.[2]
(७२) अनेकमूर्तिः :  - ज्याने अनेक आकार- मूर्ति धारण केल्या आहेत असा. तो भगवंतच विश्वातील सर्व साकारातून प्रकट झाला आहे. जगातील असंख्य जीवांना स्वतःचा उद्धार त्वरीत् करतां यावा म्हणून त्याने अनेक अवतार धारण केले.
(७२) अव्यक्तः :  - व्यक्त नसलेला. ज्या वस्तूंचे ज्ञान इंद्रियांकरवी होऊ शकते त्यास आपण व्यक्त असे म्हणतो. तो श्रीहरी आपल्यातील आत्मा म्हणजेच जाणीव स्वरूप असल्यानें त्याचेमुळे आपण पहाणे, ऐकणे, हुंगणे, रस चाखणे इत्यादि इंद्रियांच्या क्रिया करतो. तोच स्वतःच त्यामधील ज्ञाता असल्यानें इंद्रियांचा विषय होवूं शकत नाही, त्यामुळेच त्याची व्याख्या करता येत नाही.
(७२) शतमूर्तिः :  - असंख्य व्यक्त रूपे असलेला. ज्याप्रमाणे प्रकाशास स्वतःचा आकार नाही त्याप्रमाणे चैतन्यास स्वतःचा आकार नाही तरीही सर्व विचार व विचारांतून निर्देशिलेले अनेक बदल त्या आकारांचे जग त्याच्याचमुळे प्रकाशित होते, ज्ञात होते. ज्याप्रमाणे स्वप्नातील सर्व आकार हे जागृत मनातूनच निर्माण झालेले असतात त्याचप्रमाणे अस्थिर मनातून प्रकट झालेले असंख्य चंचल मायिक आकार त्याच्याच आधाराने व्यक्त होतात. ते आकार त्याचेच होतात.
(७२) शताननः :  - ज्याला सहस्रमुखे आहेत असा.[3] तो स्वतःच ह्या विश्वाचे रूप धारण करीत असल्यानें सर्व मुखे ही त्याचीच मुखे आहेत. सर्व बाजूंनी हात व पाय असलेला, सर्वतः मुख, डोळे, शिरे असलेला, सर्वत्र श्रुति असलेला तो नारायण सर्वास व्यापून उभा राहिला आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]  दिविसूर्यसहस्त्रस्यभवेद्युगपदुत्थिता  ।। गीता ११-१२
[2]   सूक्ष्माश्च तत् सूक्ष्मतरम् (मुण्डक ३.१.७.)
[3]   सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोऽक्षि शिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ (गीता १३.१४)

No comments: