08 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७६

श्लोक ७६
भूतोवासो वासुदेवः सर्वासुनिल योऽनलः 
दर्पहा दर्पदो द्दप्तो दुर्धरोऽथापराजितः  ।। [1]
(७०) भूतावासः :  - पंचमहाभूतांचे प्रमुख आश्रयस्थान. 'सर्व जीवमात्र तुझ्यामध्येच वास करतात म्हणून तुला [2]भूतावास असे म्हणतात.' अशा प्रकारचा उल्लेख हरिवंशात आला आहे. भगवंत स्वतःच गीतेमध्ये म्हणतात, 'मी सर्वांचे उप्तत्तिस्थान आहे.'[3] म्हणून तो भूतावास आहे.
(७०) वासुदेवः :  - जो आपल्या मायेच्या आवरण व विक्षेप या शक्तिंनी सर्व विश्वास व्यापतो तो वासुदेव. भगवंत स्वतःच स्पष्ट करतात की 'ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्व विश्व व्यापतो त्याप्रमाणे मी विश्व व्यापतो.'[4]
(७०) सर्वासुनिलयः :  - सर्व जीवनशक्तिंचे आश्रयस्थान. तो सर्व प्राणीमात्रांच्या अस्तित्वाचा, जीवनाचा आधार आहे. तो आत्मा आहे म्हणजेच आपणातील 'जीवन' तोच आहे. म्हणून प्रत्येक प्राण्यातील प्राणांचा आधार तोच आहे. (असु = प्रा)
(७१) अनलः :  - ज्याच्या वैभव, सामर्थ्य व ऐश्वर्यास मर्यादा नाही असा तो अनल. (अलं - पर्याप्ति) त्याच्या विभूतींना अंत नाही व त्याची महानता अमर्याद आहे. स्वभावतःच तो सर्व नामरूपादींच्या पलीकडे व सर्वव्यापी आहे. भगवंत गीतेत सांगतात – माझ्या दिव्य विभूतिंना अंत नाही.[5]
(७१) दर्पहा :  - दुर्जनांचा गर्व नाहीसा करणारा. यमुना नदीच्या तीरावर रहाणार्‍या गोपांचे व त्यांच्या गाईंचे रक्षण करण्याकरतां त्याने गोवर्धन पर्वत सहजतेनें उचलला व सहजच इंद्राचे गर्वहरण केले.
(७१) दर्पदः :  - जे नीतीने वागतात त्यांना अभिमान देणारा. जे नीतीमान् व गुणसंपन्न आहेत त्यांच्यामध्येही, धर्मशील व गुणवंतांमध्येही आपण सर्वश्रेष्ठ व्हावे अशी प्रबल आकांक्षा निर्माण करतो. हा अभिमान हेच त्याचे बल असते व त्याच्याच आधाराने नीतीचे बाबतीत कुठलीही तडजोड न करतां ते निश्चयाने वागू शकतात. हा श्रेष्ठ तर्‍हेचा आत्मगौरव आहे. कांही पाठभेदांप्रमाणे अ-दर्पदः असे म्हटले आहे. व या संज्ञेप्रमाणे जो आपल्या भक्तांना कधीही गर्विष्ठ होऊ देत नाही तो अदर्पदः. अशाप्रकारे जे भक्त आपले सर्व गुण त्याच्यापायाशी समर्पित करतात व केवळ त्याच्या हातातील एक साधन होऊन रहातात ते अर्थातच आध्यात्मिक अभिमानापासून, त्याच्या बंधनापासून सोडविले जातात. सत्वगुणाच्या प्राबल्यानें व कर्तुत्व भावनेनें अशातर्‍हेचा अभिमान निर्माण होतो व त्यामुळे त्यांचा चांगुलपणा व सत्कार्य गौरवशून्य होण्याचा धोका असतो.
(७१) द्दप्तः :  - जो आपल्या सच्चिदानंद स्वभावामध्ये सदैव निमग्न राहून त्या आनंदाचे सदैव पान करतो असा.
(७१) दुर्धरः :  - ध्यानामध्ये धारण करण्यास अत्यंत कठीण असा. योगीजनांनी अत्यंत एकाग्रतेने, सावधतेने व सततच्या तपःश्चर्येनेच त्याला प्राप्त केलेले असते. गीतेमध्ये भगवंत मान्य करतात की ,[6] ज्यांचे चित्त अव्यक्तावर केन्द्रित झालेले आहे त्यांना जास्त क्लेश सहन करावयास लागतात. देहधारी व्यक्तींना अव्यक्तरूस्वरूप प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे.
(७१) अपराजितः :  - कधीही पराभूत न होणारा. 'अपराजितत्व' हे त्या परमात्म्याचे वैभव आहे. कारण केवळ विषय जिंकले जातात. ते जाणणारा ज्ञाता कधीही जिंकला जात नाही. तो सत्यस्वरूप आत्माच असल्याने इंद्रिये व त्यांच्या देवताही त्याला जिंकू शकत नाहीत. फारकाय अत्यंत प्रबळ इंद्रिये व त्यांच्या राक्षसी वासना जरी त्याच्या विरूद्ध संघर्ष करण्यास उभ्या राहिल्या तरी त्या आत्मस्वरूप नारायणाला कधीही जिंकू शकत नाहीत.[7]
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   दुर्धरः अथ अपराजितः ।
[2]  वसन्ति त्वयिभूतानि भूतावासस्ततो भवान्  । हरिवंश २७९-५२
[3]   अहं सर्वस्य प्रभवः । (गीता ८-८)
[4]   छादयामि जगद् विश्वं भूत्वा सूर्य इवांशुभिः । (महाभारत-शांतिपर्व ३४२.४१)
[5]   नान्तोऽस्ति ममदिव्यानां विभूतीनां परंतप । (गीता १०.४०)
[6] क्लेषोऽधिक तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम् ॥ (गीता १२-५)
[7]   नैनद्देवा आप्नुवत् । देवही त्याला जिंकू शकत नाहीत. (ईशा. उप. ४)

No comments: