26 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८२

श्लोक ८२
चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्युहश्चतुर्गतिः 
चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात्  ।।
(७६) चतुर्मूर्तिः :  - चार प्रकारचे आकार, मूर्ति असलेला. नित्य अनंत असे परमतत्व जेव्हा विश्वरूपानें प्रकट होते तेंव्हा चार प्रकारांनी प्रकट होते. पुराणांतरी म्हटले आहे की भगवंताच्या अवतारांनी वेगवेगळया युगांत वेगवेगळे  रंग धारण केले. ते असे कृत युगांत पांढरा, त्रेता युगांत लाल, द्वापार युगांत पिवळा, व कलीयुगांत काळा. परंतु वेदांताच्या विचाराप्रमाणे प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात परमात्मा चार अवस्थामधून व्यक्त होतो. याप्रमाणे जागृत, स्वप्नद्रष्टा, सुषुप्त व शुद्ध चैतन्यस्वरूप. व्यष्टिमध्ये त्यांनाच म्हटले आहे विश्व, तैजस, प्राज्ञ व तुरीय. तसेच समष्टिमधील स्थूल, सूक्ष्म व कारण देहांची नांवे आहेत विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर अनुक्रमे व या तीनही देहांपलीकडे असलेला तो सनातन परमात्मा चतुर्मूर्ति होय.
(७६) चतुर्बाहुः :  - त्या परमात्मा श्री नारायणाला चार बाहू आहेत असे सुवविले आहे. मनुष्याच्या अंतरंगातील चार घटक मन बुद्धि चित्त व अहंकार हे त्या चार बाहूनी दर्शविले आहेत. ह्याच चार घटकांचे मार्फत शरीरातील सर्व व्यवहार नियमीत केले जातात, सुरळीत व योग्य तर्‌हेने केले जातात.
(७६) चतुर्व्यूहः :  - भगवंत स्वतःस चार व्यूहामधून क्रियाशील केंद्रस्वरूपात प्रकट करतात. व्यूह म्हणजे असंख्य सामान्य व्यक्तिंनी विशिष्ठ उद्देशाने केलेले कार्यप्रवर्तन (भोवरा), जे एका केंद्रवर्ती व्यक्तीच्या अधिपत्याखाली चालविले जाते. म्हणून त्यांना चतुव्यूह म्हटले आहे. ज्याप्रमाणे एकादी सेना आपल्या सेनापतीच्या अधिपत्याखाली त्याने नेमून दिलेल्या क्षेत्रात काम करते त्याप्रमाणे हे समजायचे एका रूपकाप्रमाणे असे असे दाखविले आहे की [1] 'ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या सर्वकार्याला प्रेरणा देतो, वैश्विक शक्तिच्या रूपाने प्रकट होतो व मानवीय संबंधात त्यांना आशिर्वाद देतो त्यांच्या सत्कृत्यांत त्यांना आशीर्वाद देतो व सर्व कार्यात शक्तिेह प्रदान करतो. ऐतरेयोपनिषदामध्ये या चार व्यूहांना म्हटले आहे (१) शरीरांत रहाणारा तो शरीर पुरूष, मंत्रामध्ये (छंदामध्ये) रहाणारा तो छन्दपुरूष, वेदरूपाने असलेला तो वेदपुरूष व चौथा महापुरूष.
(७६) चतुर्गतिः :  - चारही वर्ण आश्रमांची अंतिम गती. जरी बाह्यात्करी मनुष्यांचे प्रत्येक वर्गाचे, त्यांच्या कार्याचे, वर्णाचे ध्येय वेगवेगळे दिसत असले तरी शेवटी श्रीनारायणच अपरिहार्यपणे सर्वांचे ध्येय-गति आहे. तत्वचिंतक(ब्राह्मण), शासक किवा अग्रणी (क्षत्रिय), व्यापारी उद्योगी (वैश्य) व सामान्य कामे करणारे (शूद्र) हे चार वर्ण होत. तसेच विद्यार्जन करणारा (ब्रह्मचारी), कुटुंबाचे पालनपोषण करणारा- (गृहस्थ), निवृत्तीचे जीवन जगणारा (वानप्रस्थी) व सर्व संग त्याग करणारा (संन्यासी) या चार अवस्थांचे (आश्रमांचे) गंतव्य आहे श्री नारायण.
(७६) चतुरात्मा :  - कांही ठिकाणी पाठभेदानें चत्वरात्मा असेही म्हटले जाते. प्रथम चतुरात्मा या संज्ञेप्रमाणे अर्थ होईल ज्याचे मन अत्यंत शुद्ध आहे असा. श्री नारायणाचे अंतःकरण राग, आसक्ति, मद  इत्यादि विकारांनी रहित, अहंकाराच्या कुठल्याही दुःखकारक छटेनें न रंगलेले असे आहे तो त्याचा ’स्व’भाव आहे म्हणून तो चतुरात्मा - चत्वरात्मा या संज्ञेप्रमाणे अमर्याद तेजस्वरूप श्री नारायण अंतःकरण चतुष्ट्यरूपाने मनुष्याच्या अंतर्यामातून प्रगट होतो.
(७७०) चतुर्भाव :  - चारभावांचे उगमस्थान. त्याचेपासून चार वर्ण; आयुष्यातील चार अवस्थांचे चार आश्रम, मनुष्यांची चार ध्येये (पुरुषार्थ) हे भाव निर्माण झालेले आहेत. सनातन र्म शास्त्रानुसार चार पुरुषार्थ येणेप्रमाणे -  नीतिनियमानें वागणे म्हणजेच धर्मपुरुषार्थ होय. अर्थोत्पादन हा अर्थपुरुषार्थ. सर्व तर्‍हेच्या आनंदाची कामना काम पुरुषार्थ व आध्यात्मिक प्रगतीचा प्रयत्न करणे हा मोक्ष पुरुषार्थ होय. श्रीकृष्ण स्वतःच गीतेमध्ये सांगतात चारही तर्‍हेची उत्पत्ति माझेपासूनच झाली आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः
(७७) चतुर्वेदवित् :  - चारही वेदांचा ज्ञाता. चारही वेदांचा प्रतिपाद्य व चर्चेचा विषय आहे श्रीनारायण.  ज्यावेळी वेदवाङ्‌मयाच्या विद्यार्थ्याला त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेंव्हाच त्याची ज्ञानसाधना पूर्ण होते. त्याच अर्थांने भगवंत गीतेच्या १५व्या अध्यायांत म्हणतात जे सर्व वेदांनी जाणण्यास योग्य ते मीच आहे. मीच वेदांचा कर्ता आहे व वेदांचा [2]ज्ञाताही मीच आहे.
(७७) एकपात् :  - एकपाय असलेला. संस्कृतमधील पाद शद्बाचे दोन अर्थ होतात. (१) अंश व (२) पाय. भगवान गीतेमध्ये पहिल्या अर्थानें शद्ब वापरून आपल्या विभूतिंचे वर्णन करतांना म्हणतात, 'संपूर्ण विश्व हे माझ्या एका अंशाचे आधारानें [3] राहिलेले आहे. तैतिरीय आरण्यकात एक संदर्भ आहे व तो दुसर्‍या अर्थाचे (पाय) स्पष्टिकरण करतो. सर्व प्राणीमात्र हे त्याचे पाय आहेत. याच अर्थाने गीतेनेही विवेचन केले आहे. संपूर्ण ब्रह्मांडाच्या एकत्रित सामर्थ्यापेक्षाही तो महान आहे त्यामुळे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तो अनंत सत्‌स्वरूप आहे.

डॉ. सौ. उषा गुणे.



[1]    ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ - ईश्वर सर्व जीवांच्या हृदयात राहतो व हे अर्जुना ! तो आपल्या मायेने सर्व प्राणिमात्रास यन्त्रावर आरूढ झाल्याप्रमाणे भ्रमण करावयास लावतो.
 शरीरपुरूषश्छंदः पुरुषो वेदपुरुषो महपुरुषो – ऐतरेयोपनिषद् ३.२८
 गुणकर्मांच्या विभागणीनुसार चारही तर्‍हेचे वर्ण माझेकडून निर्मित झाले आहेत.
[2]   वेदांतकृत् वेदविदेव चाहम्  । गीता १५-१५
[3]   'विष्टभ्याहमिदं कृत्स्नं एकाशेन स्थितोजगत् । गीता १०-४२.

No comments: