20 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८०

श्लोक ८०
अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् 
सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधः धराधरः  ।।
(७४) अमानी :  - ज्याचे जवळ खोटा गर्व नाही असा. त्याला आपल्या दिव्यस्वरूपाचे पूर्णज्ञान असल्यानें शरीर मन बुद्धि सारख्या अनात्मवस्तूं बद्दल त्याला मुळीच खोटा अभिमान नसतो म्हणून तो 'अमानी' आहे.
(७४) मानदः :  - जो आपल्या मायेनें देहादि अनात्म वस्तूमध्ये आत्मभाव (अभिमान-ममत्व) निर्माण करतो असा. तसेच 'मान' या संस्कृत शद्बाचा अर्थ होतो 'गौरव' व त्या प्रमाणे जो आपल्या खर्‍या भक्तांचा गौरव करतो तो 'मानद'. संस्कृतमध्ये '' या मूळ धातूचा अर्थ होतो दलन करणे, चूर्ण करणे. म्हणून मानद या संज्ञेचा आणखी अर्थ होईल जो आपल्या भक्तांना निर्माण झालेला खोटा अभिमान नाहीसा करतो (चूर्ण करतो) तो.
(७४) मान्यः :  - सर्वांनी ज्यास मान द्यावा असा. तो सर्वास पूजनीय आहे कारण या वैचित्र्यपूर्ण विश्वाचे तो प्रत्यक्ष उपादान कारण (आश्रय) आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात. 'ज्याने त्या परब्रह्माचे ज्ञान करून घेतले तो [1]आदरणीय व जगतात माननीय आहे तर मग जो ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा अंगभूत आधार आहे व ज्याच्या आशीर्वाद व प्रेरणेनें प्रत्येक जीवाला जगतातील वस्तूंचे प्राण्यांचे विविध अनुभव घेतां येतात तो स्वतः किती पूजनीय असेल ! म्हणून तो मान्य आहे.
(७५०) लोकस्वामी :  - सर्व लोकांचा विश्वाचा स्वामी. 'लोक' या संस्कृत शद्बाचा अर्थ होतो 'अनुभवाचे क्षेत्र' ते चैतन्य सर्व काळी, सर्व जीवांची सर्व अनुभव क्षेत्रे (अंतर्बाह्य जागृत, स्वप्न, सुषुप्ती) प्रकाशित करत असल्याने, तोच सर्व लोकांचा नियंता, मार्गदर्शक व अध्यक्ष असल्यानें लोकस्वामी ही संज्ञा यथार्थ आहे.
(७५) त्रिलोकधृक् - जो तीनही लोकांचे धारण करतो असा. सामान्यतः "लोक" या शद्बाचा घेतला जाणारा अर्थ म्हणजे स्वर्ग, मृत्यु, पाताळ हे लोक. या खेरीज लोक म्हणजे अनुभव क्षेत्र. व त्याप्रमाणे जागृत - स्वप्न - सुषुप्ति ही क्षेत्रे लोक आहेत. आत्मा हा जाणीव शक्तीरूपानें या तीनही लोकांना आधार देतो. व त्याच्या जीवनदायी प्रकाशमय अस्तित्वाखेरीज कुठलाही अनुभव घेणे शक्य नाही.
(७५) सुमेधा :  - अत्यंत शुद्ध 'प्रज्ञा' असलेला. प्रत्यक्षतः ही संज्ञा मानवी बुद्धिची एक विलक्षण क्षमता निर्देशित करते. ती घडलेल्या अनुभवांना आपणामध्ये साठवते व पुनः पुर्वानुभवानुसार उपयोग करते तिला 'मेधा' असे म्हणतात. खरे पाहता आत्मस्वरूपाचे ज्ञान हे नव्यानें मिळवावयाचे नसून साधकाच्या संभ्रमावस्थेमुळे निर्माण झालेल्या विस्मृतीमधून पुन्हा आत्मस्वरूपाची स्मृती जागृत करावयाची आहे असे निर्देशित केले आहे. जोपर्यंत आपण आपल्या कर्‍या स्वरूपाची स्मृती जागृत करत नाही तोपर्यंत खर्‍या  स्वरूपाची विस्मृती रहाणार व त्यातून निर्माण झालेल्या अज्ञानानें सतत दुःखात बुडून रहाणार. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपण व्यानें कांही मिळवित नसतो तर आपले खरे स्वरूप पुन्हा शोधून काढतो इतकेच. आपल्या आत्तांच्या आत्म विस्मृत स्थितीच्या संदर्भात आपले परमध्येय दिव्यस्मृती स्वरूप 'सुमेधा' हेच होय.
(७५) मेधजः :  - मेध म्हणजे यज्ञ. म्हणून 'मेधज' म्हणजे यज्ञांत जन्मलेला. अश्वमेधासारख्या महान् यज्ञामध्ये [2]त्यालाच आवाहन केले जाते व त्याच्या अध्यक्षतेखाली तो केला जातो म्हणून त्याचा जन्म यज्ञात होतो असे आपण म्हणूं शकतो. गीतेचा यज्ञाचा अर्थ होतो, एखादे सहभावनेनें केलेले कर्म ज्यामध्ये आपण आपल्या शक्ति व कर्म कौशल्य निष्काम भावनेनें नियोजित कार्यात समर्पित करूं शकतो व त्या योगे अव्यक्त ब्रह्मास आवाहन करूं शकतोव त्याचे कडून बदल्यात (कृपा प्रसाद रूपानें) आपले इच्छित साध्य करूं शकतो. अशा तर्‍हेनें जेव्हा आपण आपल्या व्यक्तीमत्वाचे समर्पण करतो (यज्ञ) (मेध) तेंव्हाच आत्मप्रचितीचा उदय (जन्म) होतो. म्हणून तो मेधज आहे. वेदांताच्या अभ्यासका करतां ही संज्ञा खूपच अर्थवाही व सूचक आहे.
(७५) धन्यः :  - दैववान. त्याची कुठलीच इच्छा अपूर्ण रहात नाही किवा नव्याने मिळवण्यासारखे काही नाही म्हणून तो खरोखर कृतार्थ धन्य आहे. त्या परब्रह्माची ही स्थिती खरोखर परिपूर्ण आहे.
(७५) सत्यमेधः :  - ज्याची बुद्धि कधीही विफल होत नाही असा. तो परमात्मा सद्सत्‌विवेक बुद्धिची पराकाष्ठा आहे व तो लौकीकातील अपूर्ण परिणामांनी कधीही विचलीत होत नाही. या विविधतेच्या जगतात ' तोच' सुप्रतिष्ठित आहे. तोच जगत् आहे या सत्यापासून ती कधीही दूर जात नाही.
(७५) धराधरः :  - पृथ्वीचा मुख्य आधार. याठिकाणी पृथ्वी जड तत्व निर्देशित करते व ते सूक्ष्म अगर स्थूल स्वरूपातील जडतत्व ज्याचेपासून उत्पन्न झाले तो परमात्मा 'श्री नारायण' होय, म्हणून तो धरेचा आधार होय. भौतिकदृष्ट्या पृथ्वीला आधार आहे आपाचा व आपाला आधार आहे अंतरिक्षातील वायूचा. व वायूला आधार आहे आकाशाचा. अर्थातच जिज्ञासू चिंतकाच्या मनात आकाशाच्याही आधाराबद्दल जिज्ञासा व विचार येणारच व त्याप्रमाणे तो विचार व शोध चालू ठेवणारच. परंतु आपल्याला माहीतच आहे की आकाश ही एक संकल्पनाच असून ती केवळ बुद्धिगम्यच आहे. बुद्धिच्या अनुभवांना आधार असतो जाणीव- चैतन्याचा. म्हणून सर्व विश्वाचा आधार धराधर आहे श्रीनारायण.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   धन्यः स मान्यो भवि । विवेकचुडामणी ४२५
[2]   तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञेप्रतिष्ठितम् 

No comments: