01 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९४

श्लोक ९४
विहायसगतिर्ज्योतिः सुरूचिर्हुतभुग्विभुः 
रविर्विरोचनः सूर्यः सवितारविलोचनः  ।।
(८७) विहायसगतिः :  - विहायस् शद्बाचा अर्थ होतो अंतरिक्ष किंवा आकाशासंबंधी. व गति म्हणजे वेग (वेगवान) म्हणून संपूर्ण संज्ञेचा अर्थ होईल ज्याची गति अंतरिक्षामधून असते असा सूर्य नारायण.
(८७) ज्योतिः :  - स्वतेजानें दीप्तिमान असा. तो परमेश्वर सर्व ज्योतींचीही ज्योति (प्रकाश) आहे. त्याच्याच प्रकाशांत सर्व प्रकाशित झालेले आहे. त्याच्याच प्रकाशानें   सर्वज्ञान होत असते, म्हणून श्री नारायण स्वतः स्वयंप्रकाशित आत्मस्वरूप आहे.
(८७) सुरूचिः :  - 'सु' म्हणजे शोभायमान् सुंदर, रूचि म्हणजे इच्छा, वैभव. श्रीनारायणाचे वैभव म्हणजेच हे विश्व होय. त्याच्याच संकल्पातून जगताची उप्तत्ति झाली आहे. परब्रह्म अगर परमसत्य जेव्हा समष्टि मनातून कार्य करते तेंव्हा त्यालाच समष्टिकारण अगर 'श्वर' म्हटले जाते. (माया) त्यामुळे श्रुतिने आपल्याला एक अत्यंत अबाधित वैज्ञानिक सत्य सांगितले आहे की, 'हे विश्व ही त्या नारायणाचीच इच्छा आहे.'.
(८७) हुतभुक् - यज्ञयागाच्या पवित्र अग्निमध्ये जे जे समर्पित केले जाते त्याचा स्विकार करणारा तो 'हुत-भुक्' श्री नारायणच होय. श्रद्धाळू भक्त आपापल्या देवतांना आवाहन करण्याकरतां हवि अर्पण करतात.  त्या त्या देवतांना अर्पण केलेले हवि श्री नारायणच त्या त्या देवतांच्या रूपानें स्विकार करतो.
(८८०) विभुः :  - सर्वव्यापी. आत्मस्वरूप श्रीनारायण अनंत व नित्य वर्तमान असल्यानें दिक्कालातीत आहे. कुठल्याही उपाधींनी मर्यादित नसल्यानें तो आत्मस्वरूपाने सर्वव्यापी आहे.
(८८) रविः : सर्व वस्तूमात्रातील रस ओढून घेतो तो रवि. सूर्यनारायणाचे रूपाने श्रीविष्णू जगतातील सर्व वस्तूमधील रस शोषून घेतो.
(८८) विरोचनः :  - जो अनेक आकारांनी प्रकाशित होतो असा. भक्त कोणत्याही स्वरूपांत त्याचे ध्यान करोत त्यांच्या समाधानाकरतां तो त्या त्या स्वरूपांत प्रकट होतो. दुसरा अर्थ - जो स्वतःस चंद्र, सूर्य, नक्षत्रे इत्यादि विश्वातील तेजस्वी गोलकांतून व्यक्त करतो तो.
(८८) सूर्यः :  - शद्ब व्युप्तत्तिप्रमाणे या संज्ञेचा अर्थ होतो - असे उप्तत्ति स्थान ज्याचे मधून सर्व वस्तूजात निर्मित झाले किवा ज्याचे मधून बाहेर पडले. परमेश्वर सर्व विश्वाचे आदिकारण असल्यानें तोच उप्तत्तिस्थान (गर्भाशय)आहे. जगताचे स्तरावर हा सूर्यच जगतातील सर्व प्राणीमात्रांचे पालनपोषण करतो. इथे हे लक्षांत येते की भगवंताची अनेक नांवे सूर्याचे संदर्भात किवा सूर्याशी निगडीत आहेत. सूर्यमालेमध्ये सूर्य ज्याप्रमाणे केंद्रवर्ती राहून तिला प्रवर्तित करतो. भगवंतही तसाच आपल्या अंतर्यामी आहे. सूर्याप्रमाणे भगवंताच्या शक्तिमंडलातून प्रसृत होणारी सर्वोपकारी किरणे असंख्य प्राणीमात्रांना जीवन प्रदान करतात.
(८८) सविता : - जो आपणामधून विश्वातील सर्व जीवमात्रांस, जडचेतन वस्तूंना प्रसवितो तो. तेच आत्मतत्व [1] सूर्याचे माध्यमातून कार्य करते म्हणून त्यालाच सविता म्हटले आहे.
(८८) रविलोचनः : - सूर्यरूपी डोळे असलेला. त्या विराट स्वरूप परमेश्वराचे चंद्र सूर्य हे लोचन[2] आहेत असे वर्णन उपनिषदे व गीतेत आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



         ज्योतिषांमपि तज्जोतिः  । गीता १८-१८
         तमेवभांतमनुभाति सर्व तस्यभासा सर्वमिदं विभाति  । मुंडकोपनिषद २-६-१०
   समष्टि कारणशरीराभिमानी परमात्मा ईश्वरः ।।
[1]   प्रजानां तु प्रसवनात् सवितेति निगद्यते ।।
[2]  'अग्निर्मूर्धा चक्षूंषी चंद्र सूर्यौ ।' मुंडकोपनिषत्.

No comments: