22 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०१

श्लोक १०१
अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रूचिराङ्गदः 
जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः  ।।
(९४) अनादि:  - जो आद्यकारण आहे असा. व त्याला स्वतःला कुठलेही कारण नाही असा. श्री नारायण हा अनादि व अनंत आहे.
(९४) भूर्भुवः :  - जो भूमीचा प्रत्यक्ष आधार आहे असा. पृथ्वी नित्य अंतरिक्षात फिरत असते. आपण असे म्हणूं शकतो की जो स्वतःच पृथ्वीही आहे व ज्या अंतरिक्षामध्ये सर्व विश्व रहाते व आवर्तित होत असते तो आधारही श्री नारायणच आहे.
(९४) लक्ष्मीः :  - जो सर्व विश्वाचे वैभव, संपत्ती गौरव आहे असा. जर आत्माच नसता तर सर्व निश्चल, अजात व मृत राहिले असते. सर्व प्राणीमात्रांमधील जीवन व शुद्ध चैतन्य हे त्याचेच वैभव आहे.व हे क्रियाशील विश्व त्याचेमध्ये राहते व त्याचा उगमही तोच आहे. काही पाठभेदांत ९४ व ९४ या संज्ञा एकत्र केलेल्या आढळतात. त्या दोन्हींचा मिळून अर्थ होईल जो विश्वातील वैभव आहे व अंतरिक्षाचेही वैभव आहे असा श्रीहरी.
(९४) सुवीरः :  - ज्याला असंख्य गती आहेत व त्या सर्व अत्यंत दिव्य आणि गौरवशाली आहेत असा. त्याने आपल्या सर्व अवतारांतील आपल्या सर्व कृत्यांमधून व यशामधून आपला अतुलनीय भव्य पराक्रम प्रगट केला आहे.
(९४) रूचिराङ्गदः :  - जो अत्यंत तेजस्वी सुंदर भुजबंध धारण करतो असा. भुजबंध या नावाचा अलंकार पूर्वीचे काळी राजे महाराजे वापरत असत व त्यामुळे शत्रूंच्या तलवारीच्या आघातांपासून भुजांचे रक्षण होत असे.
(९४) जननः :  - जो सर्व प्राणीमात्रांस जन्म देतो असा. श्रीनारायण हा सर्वांचा महान् पिता आहे[1] कारण सर्व विश्व त्याचेच पासून जन्माला आले आहे. सर्व सृजनापूर्वी तोच होता, त्याचेपासूनच सर्व उत्पन्न झाले, त्याच्यामध्येच सर्वांना अस्तित्व आहे व त्याच्याच सामर्थ्यानें सर्वांचे भरण पोषण होत असते. अर्थात श्रीनारायणच जगत्पिता, जगदीश्वर आहे.
(९४) जनजन्मादिः :  - जो जगतातील सर्व जीवांच्या जन्माचे एकमेव मूलकारण आहे असा. वासना ह्या केवळ निमित्त कारण असतात. परंतु सत्य व अंतिम कारण आहे श्रीनारायण.
(९४) भीमः :  - ज्याचा आकार अत्यंत भव्य असल्यानें पापी लोकांच्या मनांत ज्याच्यामुळे भय निर्माण होते असा. 'हे तुझे हे अद्‍भुत ग्र रूप पाहून सर्व विश्व भयभित झाले आहे.' [2] असे भगवंताचे रूप पाहून अर्जुन घाबरून म्हणतो तसेच तो म्हणतो, महात्मन् तुझी ही अनंत भव्य रूपे पाहून सर्व विश्व व मीही अत्यंत भयभित झालो आहोत.[3] तुझे हे आकाशाला भिडणारे भव्यरूप पाहून माझे हृदय भीतीनें मृतवत झाले आहे. हे विष्णु, माझ्या मनाला धीर नाही की शांतीही नाही, असे वारंवार उद्गार भगवंताचे भव्य विश्वरूप पाहून अर्जुनाला काढावे लागले.
(९४) भीमपराक्रमः :  - ज्याचा पराक्रम दुर्दमनीय असून शत्रूंना भय निर्माण करतो तो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   पुतासि लोकस्य चराचरस्य । या चर्-अचर जगताचा तू पिता आहेस.
[2]  द्दष्ट्वाद्‌भूतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ।
[3]  नभःस्पृशं दीप्तमनेक वर्णम व्यात्ताननम् दीप्त विशालनेत्रम् 

No comments: