31 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०४

श्लोक १०४
मूर्भुवःस्वस्तरूस्तारः सविता प्रपितामहः ।
यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङगो यज्ञवाहनः  ।।
(९६) भूर्भुवस्वस्तरूः :  - भूः (जगत), भुवः (अंतरिक्ष), स्वः (स्वर्ग) या तीनही लोकांना व्यापून असलेल्या जीवन वृक्षामधील प्रत्यक्ष रस हा श्री विष्णुच आहे. भू, भुवः, स्वः या वैदिक नावांनी हे तीन लोक प्रसिद्ध आहेत. संस्कृतमध्ये ’लोक’ म्हणजे अनुभवक्षेत्र होय. त्यामुळे या तीन संज्ञांना व्याहृती असे म्हटले जाते. व्यक्तिगतरित्या त्यानी आपल्या जागृत स्वप्न सुषुप्ती या जाणिवेच्या अवस्थेतील अनुभव दाखविले जातात. व्याहृति हे मंत्रवर्ण आहेत. व त्याच्या सहाय्यानें परमात्मा स्वतः आहुति देऊन यज्ञ करीत आहे व त्यानेच या विश्वाचे पालन पोषण होत असते. या सुंदर रूपकाने आत्मस्वरूप 'श्रीनारायण' हाच दिव्य असा 'रस' असून तो जाणीवेच्या सर्व स्तरावरील सर्व अनुभवांमधून सर्ववेळी या तीनही लोक व्यापणार्‍या जीवनवृक्षामधून वहात असतो असे सुचविले आहे.
(९६) तारः :  - जो सर्वांना तारून नेतो तो. पूर्ण शरणागत होऊन अढळ श्रद्धेने व क्तीने जर आवाहन केले तर भक्तांना या संसार सागरातून तारून नेणारा एकमेव, सनातन नावाडी तोच आहे, तोच तारण आहे. ज्ञानपूर्वक, एकाग्र व भक्तियुक्त चित्तानें ध्यान केले असतां आपल्या प्रत्येकामधील जाणीव जागृत होऊन वरच्या स्तरावर पोहोचते व त्या स्थितीत नित्य पूर्णब्रह्माचा अनुभव येतो. तोच श्री नारायण.
(९६) सविता - सर्व लोकांना जन्म देणारा. तो विश्वाचा दी पिता आहे.
(९७०) प्रपितामहः :  - सर्व जीवांच्या पित्यांचाही पिता आहे असा. त्रिमूर्तीमधील विधाता, ब्रह्मदेव हा स्वतः त्या आत्मतत्वामधून निर्माण झाला. ब्रह्मदेवास आपल्या वाङ्‌ग्मयांत पितामह म्हटले आहे.
(९७) यज्ञः :  - ज्याचे यज्ञ हेच स्वरूप आहे असा. सर्व जगताचे कल्याणाकरतां व सर्व जीवांच्या सुखस्वास्थ्याकरतां अत्यंत शुद्ध अंतःकरणाने, पूर्ण समर्पित भावाने व सर्वांच्या सहकार्यानें केलेले कर्म म्हणजेच 'यज्ञ'होय. ज्या ज्या ठिकाणी असे स्वार्थरहित सर्वांच्या सहकार्याने कर्म केले जाते तेथे त्या जीवांच्या कर्मामधून यज्ञस्वरूप नारायणच प्रकट होतो.
(९७) यज्ञपतिः :  - सर्व यज्ञांचा स्वामी. सर्व निस्वार्थी व एकोप्यानें केलेल्या कर्मांचा (यज्ञांचा) मी भोक्ता आहे हे भगवंताचे आनंदोद्गार आहेत. तसेच ते म्हणतात सर्व यज्ञांचा भोक्ता व प्रभूही मीच आहे. [1]
(९७) यज्वा :  - वेदांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे अत्यंत कसोशीने जो यजन करतो तो. आपल्या सर्व दिव्य कर्मामध्ये जो ही यज्ञभावना सदैव जागृत ठेवतो तो श्री नारायण यज्वा आहे. [2]
(९७) यज्ञाङगः :  - यज्ञामध्ये उपयोगांत आणली जाणारी साधने वस्तू हीच ज्याची अंगे आहेत असा. हरिवंशामध्ये वर्णन केल्याप्रमाणे यज्ञामधील वस्तु सर्व नारायणचीअंगे आहे.
(९७) यज्ञवाहनः :  - वेदांमधील आदेशांप्रमाणे जो पूर्णपणे विधी युक्त व बिनचूक यज्ञक्रिया करतो तो यज्ञवाहन होय. तोच नारायण होय.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   अहं हि सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच ॥ गीता ९.२४
[2]     ९७१ वी ’यज्ञ’ ही संज्ञा या संदर्भात पहावी. याच अर्थाने ’यज्ञ’ ही संज्ञा गीतेच्या ३ र्‍या अध्यायात वापरली गेली आहे.

No comments: