16 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९९

श्लोक ९९
उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः 
वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः  ।।
(९२) उत्तारणः :  - जो आपल्याला संसारसागरातून वर उचलतो तो. आपणच आपल्याला देह-मन बुद्धिच्या द्वारा या सतत बदलणार्‍या प्रकृतीच्या चक्राशी बद्ध करून घेतले आहे. त्यातील बदलामध्येच गुंतून गेल्यामुळे त्यातील क्षणभंगुरतेचे भयंकर दुःख आपल्याला होत राहते. जेव्हा आपण आपले अवधान प्रकृतीच्या या सतत बदलणार्‍या चंचल स्वरूपावरून उचलतो व सर्व प्राणीमात्रांतील सर्व परिवर्तने सतत प्रकाशित करणार्‍या आत्मस्वरूपावर केंद्रित करतो तेंव्हा आपला उद्धार होतो. व आपण अमर्त्य, अपरिवर्तनीय अत्यंत समाधान देणार्‍या आनंद स्थितीला प्राप्त होतो. म्हणूनच श्री नारायणास 'उत्तारण' उद्धारकर्ता[1] म्हटलेले आहे. त्याचा तारक मंत्र आपल्याला इंद्रियसुखाच्या डबक्यातून वर काढतो व पूर्णता व शांतीच्या दिव्य शिखराकडे नेतो.
(९२) दुष्कृतिहा :  - कृति म्हणजे कर्म - क्रिया. दुष्कृती म्हणजे वाईट कर्म. कर्म इंद्रियसुखाच्या लालसेनें केले जाते तेंव्हा त्यातून वासना निर्माण होतात. व त्यातून पुन्हा तीच तीच कर्मे करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जेव्हा मन आत्म्याकडे, श्रीनारायणाकडे वळविले जाते, तेंव्हा या वासना नष्ट होतात. म्हणूनच भगवंताला दुष्कृती नष्ट करणारा (हा) असे म्हटलेले आहे.
(९२) पुण्यः :  - अत्यंत विशुद्ध. जो आपल्या भक्तांच्या अंतःकरणांतील आसक्तीपूर्ण इंद्रियसुखाच्या वासना नष्ट करून त्याचे अंतःकरण अत्यंत शुद्ध करतो तो. अशा अंतःकरण शुद्ध झालेल्या भक्तांना आत्मस्वरूपाकडे नेणारा तो श्रीनारायण 'पुण्यच' आहे.
(९२) दुःस्वप्ननाशनः :  - जो सर्व दुष्ट स्वप्ने नाहीशी करतो तो. सर्वात वाईट स्वप्न म्हणजे संसार. द्वैतभावना हे अत्यंत भीतीदायक स्वप्न आहे, त्यामुळे भयानक वेदना, अंतःकरण कुरतडणारी भीती व बुडवून टाकणारे दुःख निर्माण होते.
     आपल्या अंतर्मनांत खोल दडलेल्या भावनांचा स्फोट म्हणजेच स्वप्न होय. खरा भक्त भगवंतास पूर्ण शरणागत असतो. त्याचे अंतःकरण नारायणस्मरणांत पूर्ण एकाग्र झालेले असते त्यामुळे अशा पूर्ण समर्पित अंतःकरणात कुठलीच भावना दडपून राहण्याची शक्यता नसते. त्याच्या अंतर्मनात कुठलाच अर्धवट समजलेला विचार रेंगाळत नसतो, कुठली दडपलेली इच्छा अगर अस्फुट वासनांचे ओझे नसते. दाबून ठेवलेले अनैतिक वाईट हेतू, अनैतिक वासना, गलिच्छ प्रवृत्ती ह्यांना त्याच्या अंतःकरणांत स्थानच नसते. त्यामुळे त्याला कसलीही वाईट भीतीदायक स्वप्ने डत नाहीत. शेवटी प्रत्येक भक्त आपल्या क्षुद्र अहंकाराच्या, अधाशीपणाच्या वर उठतो व नारायणभावामध्ये प्रविष्ठ होतो.
(९२) वीरहा :  - जो अनेक गर्भावस्थांतून हिंडण्याचा मार्ग बंद करतो तो म्हणजेच जन्म मृत्युच्या चक्राची गती नाहीशी करणारा. वीर म्हणजे अनेकविध मार्ग किंवा जो अनेक अवस्थांमध्ये अनेक तर्‍हेने कार्य करतो तो वीरहा.
(९२) रक्षणः :  - जो विश्वाचे रक्षण करतो तो. त्रिमूर्तीमध्ये विष्णु हा जे जे निर्मित आहे त्याचे पालन करणारा आहे. साधुत्वाचे रक्षण करण्याकरतां दुष्कृत्यांचा नाश करण्याकरतां व धर्मसंस्थापना करण्याकरतां भगवंत अवतार घेतात.[2]
(९२) सन्तः :  - ही संज्ञा अनेक वचनी वापरली आहे व तिचा अर्थ होईल सज्जन. ज्यांचेजवळ उत्तम गुण आहेत, ज्यांची नीतिमुल्ये श्रेष्ठ आहेत, आध्यात्मिक पवित्रता आहे, व ज्यांना शास्त्राचेही उत्तम ज्ञान आहे त्यांना 'संत' असे म्हणतात. येथे बहुवचन वापरून असे सुचविले आहे की, श्रीनारायणाचे पवित्र सौंदर्यच जणू या संत संगतीच्या वैभवातून व्यक्त होत असते.
(९३०) जीवनः :  - सर्व जीवंत प्राणीमात्रांमधील चैतन्य. प्राण्यांमध्ये अधिष्ठित असलेले परमतत्व – आत्मा हाच जीवनदायी तेज असून प्राण्यांचे अस्तित्व आत्म्यामुळेच आहे. तोच श्रीनारायण होय. "पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी माझ्या तेजाने सर्व प्राणीमात्रांचे धारण करतो, स्वतःच रसस्वरूप चंद्र होऊन सर्व वनस्पतींची पुष्टी करतो"[3] असे भगवंत स्वतःच उद्‌‍घोषितात.
(९३) पर्यवस्थितः :  - सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वठिकाणी स्थित असलेला ज्याचेवर सर्व अस्तित्व अवलंबून आहे व ज्याचे पलीकडे काहीच नाही असे जे प्राणीमात्रांमधील अंतीम दिव्यत्व ते श्रीनारायणच होय.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   तारयति इति तारः – तार म्हणजे जो वाचवितो, वर काढतो, नियंत्रित करतो, शुद्ध करतो.
[2]   परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे ॥ गीता ४.८
[3]   गामाविश्य च भूतानि धारायाम्यहमोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमोभूत्वा रसात्मक ॥ गीता १५.१३

No comments: