13 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९८

श्लोक ९८
अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः 
विद्बत्तमो वीतभयः पुण्यश्रवण कीर्तनः  ।।
(९१) अक्रुर:  - जो कधीही क्रूर होत नाही असा. क्रूरता ही नेहमी क्रोधातून उप्तन्न होत असते, व क्रोध इच्छा आसक्ती मधून उप्तन्न होतो. श्री नारायण स्वतः परिपूर्ण व तृप्त असल्याने त्याचेजवळ इच्छाच नाहीत, अर्थातच् परिणामस्वरूप क्रोध व क्रुरताही त्याचेठिकाणी नाहीत. दुसरा साधारण अर्थ होतो, 'ज्याने 'यादवां'मधील अक्रूराचे रूप धारण केले असा. अक्रूर हा भगवंताचा महान् भक्त होता व त्याला अनेक दिव्य शक्ति प्राप्त झाल्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी एकादे दिव्यत्व अनुभवास येते तेथे तेथे माझ्याच तेजाचे, अंशाचे ते प्रकटीकरण आहे असे तू समज असे भगवंत स्वतःच गीतेमध्ये सांगतात. म्हणून ही संज्ञा, भगवंताच्या तेजाच्या एका अंशाने प्रकाशित झालेल्या कंसदूत अक्रूराचेही निर्देशन करते.
(९१) पेशलः :  - जो अत्यंत मृदु आहे असा. जेव्हा भक्त देहबुद्धीच्या व अहंकेंद्रित जीवनाच्या वरती उठण्याचा प्रयत्‍न करतात व भगवंताला मदतीकरता अतिशय कळवळून हाक मारतात, तेव्हा त्या भगवंताचे अथांग दयापूर्ण करुणामय अंतःकरण भक्ताकरतां दिव्य प्रेमाने व मृदुतेनें पाझरू लागते.
(९१) दक्षः :  - ही संज्ञा अत्यंत तत्परतेची अवस्था दर्शविण्याकरतां वापरली जाते. सैनिकी शिक्षणांत 'दक्ष' ही आज्ञा पूर्ण लक्ष , सावधानता व कुठलेही काम अत्यंत चपळाईनें करण्याकरतां सिद्ध व्हावे याकरतां दिली जाते. हे सर्व गुण 'दक्ष' स्थितीत त्याचेजवळ असावे लागतात. भगवंत या विश्वाची सेवा करण्यामध्ये अत्यंत 'दक्ष' आहे, भक्तांकरतां धावून येण्यांत तत्पर आहे. सर्व सामर्थ्ययुक्त व दिव्य कर्मकौशल्याने युक्त असा श्री नारायण सर्वांच्या शीघ्र मदतीकरतां सर्व ठिकाणी, सर्व वेळेला सर्व परिस्थितीमध्ये तत्पर व दक्ष असतो. त्या आशयाने विष्णुसहस्रनामामधील ही संज्ञा आत्मस्वरूप श्रीनारायणसाठी अत्यंत सार्थकतेनें व सुंदरतेने वापरली आहे.
(९१) दक्षिणः :  - जो अत्यंत उदार आहे असा. साधारणतः यज्ञ यागादी क्रिया केल्यानंतर ते चालयिणार्‍या पुराहितांना जे सत्कार अगर दक्षिणारूपी द्रव्य दिले जाते त्याला 'दक्षिणा' असे म्हणतात. ही दक्षिणा ज्या विशाल औदार्यानें व अंतःकरणपूर्वक दिली जाते ते उदार हृदय म्हणजेच श्रीनारायण 'दक्षिणः'. अर्थातच हे दाक्षिण्य स्वार्थीवृत्ती व संपत्तीच्या आसक्तीच्या पूर्ण विरोधी आहे. अपार कृपादृष्टी असलेला व साधू जनांबद्दल अत्यंत उदार वृत्ती असल्यानें जो आपली सर्व समृद्धि त्यांना आनंदानें व उदारतेनें देण्यांत तत्पर आहे असा श्रीनारायण 'दक्षिण' आहे.
(९१)क्षमिणां वरः :  - ज्याचेजवळ पापी लोकांबद्दल जास्तीत जास्त सहनशीलता आहे व त्यांच्या पापाबद्दल अमर्याद क्षमाशीलता आहे असा श्रीनारायण 'क्षमिणावर' आहे. अत्यंत क्षमावृत्तीचे उदाहरण म्हणून पृथ्वीचा उल्लेख केला जातो. (पृथ्वी-क्षमा) परंतु श्रीनारायण तिच्याहूनही क्षमाशील आहे. तो दुष्पवृत्त, अन्यायी घाणेरड्या व स्वार्थी प्रवृत्ती असलेल्या बद्दलही महान क्षमाशीलता प्रकट करतो. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण इत्यादिं सारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना त्यानें अनेक वेळां संधी दिली जेणे करून त्यांना आपल्या अनैतिक जीवनाचे ज्ञान होइल व जगाकडे वाईट प्रवृत्तीनें पाहण्याचे ते सोडून देतील. जेव्हा त्यांना सुधारण्याचा कुठलाच मार्ग शिल्लक राहिला नाही तेंव्हाच भगवंतांनी त्यांचा नाश केला पण तोही अत्यंत दयाळू अंतःकरणाने !
(९२०) विद्वत्तमः :  - ज्याचेजवळ सर्वात जास्त विद्वत्ता सूज्ञता आहे असा. जगामध्ये आपापल्या विषयांमध्ये अत्यंत हुषार असे अनेक विद्वान आहेत परंतु श्रीनारायण हा स्वतः सर्वांच्या अंतःकरणातील जाणीव स्वरूप असल्यानें एकाचवेळी सर्व ठिकाणी, सर्व विद्वान माणसांचेही ज्ञान जाणणारा शुद्ध ज्ञान स्वरूप तोच आहे. सर्वज्ञानी श्रीनारायण हाच ज्या ज्ञानानें सर्वज्ञान प्रकाशित होते असे अनंत सत्यज्ञान आहे.
(९२) वीतभयः :  - ज्याचे सर्व भय नाहीसे झाले आहे असा. जेव्हा द्वैत असते तेंव्हाच भय उत्पन्न होते. अद्वैत सत्यज्ञानात कुठलेच भय असणे शक्य नाही कारण तोच एकमेव अद्वितीय आहे. सर्व धर्मभ्रंथ सांगतात की 'नारायणभाव ही अभय स्थिती आहे.
(९२) पुण्यश्रवणकीर्तन :  - ज्याच्या महान गुणांचे श्रवण केले असता व संकीर्तन केले असतां भक्तांचे अंतःकरणांत पुण्याचा उदय व वृद्धि होते असा श्री नारायण. ह्या सत्य विधानाचा विद्यार्थ्याचेकडून कधीही नीट शोध घेतला जात नाही त्यामुळे ते या संज्ञेचा अगदी वरवरचा व साधाच अर्थ गृहीत धरतात. भगवंताच्या दिव्यकथा 'श्रवण' करणे म्हणजे लक्ष्यपूर्वक ऐकून त्यात समरस होणे व नंतर त्या भगवंताच्या महान् गुणांचे मनन करणे होय. अशाप्रकारे आपले मन दिव्य विचारांने प्रकाशित झाले पाहिजे. भगवंताच्या दिव्यगुणांचे पुनः पुन्हा उच्चारण किवा संकीर्तन पुरेसे होत नाही तर आपण स्वतःस परमेश्वरास समर्पित केलेल्या कर्मामध्ये स्वतःच बांधून घेतले पाहिजे. हेच खरे संकीर्तन व त्याचे गुणगान होय. संकीर्तन म्हणजे केवळ मोठमोठ्यानें स्तोत्र म्हणणेही नाही किवा मंत्रांचे पुटपुटणेही नाही. तर आपणामधून भगवंताची अभिव्यक्ती होईल असे आपणच आपणास तयार करणे, शिकवणे. आपली शारीरिक कर्मे, मनोभावना व बौद्धिक विचार असे असले पाहिजेत की आपल्यामधून भगवंताच्या दिव्य अस्तित्वाचे भान प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी प्रकट होईल. अशा भक्तांचे संपूर्ण आयुष्यच त्यामधील गतीमान सौंदर्य, प्रेम, ऋजुभावना, समर्पण यामुळे हृदयस्थ भगवंताची एक अखंड पूजा व अखंड नामसंकीर्तनच होऊन जाते.
डॉ. सौ. उषा गुणे.


   यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेववा  । तत्देवावगच्छ त्वं ममतेजोंऽश संभवम्  ।। गीता १०-४१

No comments: