10 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९७

श्लोक ९७
अरौद्रः कुंडली चक्री विक्रम्युर्जितशासनः 
शद्बातिगः शद्बसहः शिशिरः शर्वरीकरः  ।।
(९०) अरौद्रः :  - ज्याचे ठिकाणी कुठल्याही विघातक अगर भीतीदायक (रूद्र) इच्छा अगर भावना नाहीत असा. पूर्णावस्था ही अशी स्थिती आहे की जिच्यामध्ये मानवी मनाची कमजोरी असूच शकत नाही. जगातील सर्व मानवांवर अधिराज्य करणारे राग, द्वेष, ईषा, मत्सर व त्यांचे सहचारी विकार ज्याचे ठिकाणी कधीच वास करू शकत नाही असा श्रीनारायण अरौद्र आहे.
(९०) कुण्डली :  - ज्याचे कानामध्ये सुविख्यात अशी मकरकुंडले ही कर्णभूषणे आहेत असा. कुंडली ही संज्ञा कुंडलीनी शक्तिचे निदर्शन करते. ही सर्पाकार शक्ति साडेतीन वेटोळी केलेली व गूढ शक्ती धारण करणारी असून सद्यः स्थितीत निद्रिस्त, निश्चल अवस्थेत मनुष्याच्या मेरूदंडाचे तळाशी उदरामध्ये रहाते. तसेच हा सर्प सहस्र मुखे असलेला अनंतनागही असूं शकतो. व त्याचे अंकावरती श्रीनारायण आपल्या योगनिद्रेत पहुडले आहेत. सर्व धर्मामध्ये सर्प हे मनाचे प्रतीक मानलेले आहे. व हिंदूधर्मात तर सिद्ध झालेलेच आहे. श्रीकृष्णाचे कालीयाचे मस्तकावरील नृत्य असो किवा भगवान शंकरांनी सर्पाचीच विभूषणे धारण केलेली असोत किवा श्रीहरीने अनंतनागावर शयन केलेले असो, ही सर्व रूपके अत्यंत चपळ व विखारी मनावरील स्वामीत्वच दर्शवितात.
(९०) चक्री :  - जो नेहमी सुदर्शन नांवाचे चक्र धारण करतो असा किंवा सुदर्शन - मंगल दृष्टी. त्या सुदर्शनाने श्रीहरी आपल्यातील सर्व अमंगल व नीच प्रवृत्तींचा नाश करतो. अर्थातच त्या व्यक्तीला दिव्य आत्मस्वरूपाचे दर्शन होते.
(९०) विक्रमी :  - जो सर्वात जास्त साहसी व पराक्रमी आहे असा. वि म्हणजे पक्षी. तो पक्ष्याच्या (शुभ्र गरूड) वाहनावरून आकाशमार्गाने क्रमणा करतो म्हणून तो नारायण विक्रमी आहे, अशी सुविख्यात आख्यायिका आहे.
(९०) उर्जितशासनः :  - जो आपल्या बाहूंनी सर्वांवर शासन (अधिराज्य) करतो तो. त्याच्या आज्ञा आपल्याला धर्मग्रंथांचे द्वारा निश्चित ज्ञान देतात. त्यामुळे योग्य आचरण कोणते व आपल्यातील विघातक प्रवृत्ती कोणत्या हे आपणांस समजते. जर मनुष्याने समजूनही त्याची अवज्ञा करण्याचे दुःसाहस केले तर अशा सर्व प्रसंगी मनुष्यास कडक शिक्षा केली जाते. आज्ञेचा भंग झाल्यास ताबडतोब त्याचेकडून शिक्षा केली जाते परंतु ती प्रेमळ व निवारक असते. पण त्याला कुठलीही सबब मान्य नाही, कुणाचाही अपवाद करत नाही किवा कुठलीही परीस्थितीजन्य अडचणही मान्य करीत नाही.
(९१) शद्बातिगः :  - जो सर्व शद्बाचे पलीकडे आहे असा. तो वर्णनातीत आहे. वेद हे केवळ त्या सत्याचे सूचन करतात. ते त्याचे वर्णन करूं शकत नाहीत. त्या सत्याचे स्पष्टीकरण करूं शकत नाहीत. इतकेच काय त्याची व्याख्याही करूं शकत नाहीत. ते अनंत, परमसत्य वेदांच्याही पलीकडले आहे इतकेच नव्हे तर अत्यंत कुशाग्र तरीही मर्यादित अशा बुद्धि व मनाने जे प्राप्त करणे शक्य आहे, त्याच्याही ते पलिकडचे असते.
(९१) शद्बसहः :  - वैदिक मंत्रांनी केलेले आवाहन जो मान्य करून घेतो तो. जरी वेदांना त्या परमसत्याची पूर्णपणे व्याख्या करतां आलेली नाही तरीही उपनिषदांतील तत्त्वांचे योग्य तर्‍हेनें मनन केले व त्यातील आशयाचे ध्यान केले तर त्यातील ध्यानगम्य गर्भितार्थ मनुष्यास त्या अनंत दिव्य साक्षात्कारापर्यंत नेऊन पोहोचवितो.
(९१) शिशिर:  - शिशिर ऋतु -थंडीचा काल. भारतात हा अत्यंत शीतकाल असतो. म्हणून ही संज्ञा सुचविते की जो कोणी संसार तापानें त्रस्त झालेला आहे त्याला आश्रय देणारा भगवंत शिशिरातील निवास  आहे.
(९१) शर्वरीकरः :  - शर्वरी म्हणजे रात्र. अंधःकार. या संज्ञेचा अर्थ होईल अंधःकार निर्माण करणारा परमेश्वर. ज्यांना सत्य दर्शन झालेले असते त्यांना आपले दुःख वेदानांनी भरलेले व काळजीनें व्यापलेले व ताणतणाव युक्त जग माहीतीच नसते. व जे आपल्याच अहं भावनेत जगत असतात त्यांना सत्य माहीत नसते. त्यांचेकरतां ते अज्ञानाच्या पटलाने झाकलेले असते[1] हे स्पष्टच आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ गीता २.६९ सर्व जीवमात्रांना जी रात्र असते तिच्यामध्ये संयमी मुनी जागा असतो, व ज्यामध्ये सर्व जीव जागे असतात ती संयमी मुनीला रात्र असते.

No comments: