04 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९५

श्लोक ९५
अनंतो हुतभुक् भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः 
अनिर्विण्णः सदामर्षी लोकाधिष्ठानमद्‍भुतः  ।।
(८८) अनंतः :  - ज्यास अंत नाही असा. आत्मा दिक्कालातीत आहे. तो सर्वव्यापी असल्यानें अमर आहे, निर्विकार आहे.
(८८) हुतभुक् :  - पवित्र यज्ञीय अग्निमध्ये भक्तिनें समर्पित केलेल्या आहुति स्विकारणारा तो हुतभुक श्री नारायण. जरी त्या आहुति विशिष्ठ देवतांच्या नावांने अर्पित केलेल्या असल्या तरी शेवटी त्या श्री नारायणाला त्यादेवतांच्या स्वरुपात अर्पित होतात. कारण तोच अनंत परमात्मा सर्व स्वर्गीय व लौकीक  विश्वातील, सर्व साकार रूपातून अंतर्बाह्य लीला करत असतो.
(८८) भोक्ता :  - जो शरीर मन बुद्धिच्या माध्यमातून विषय भावना व विचारांच्या जगताचा अनुभव घेतो तो दुसरा कोणी नसून आत्माच असतो. अनुभवांच्या साधनामधून व्यक्त होत जीवरूपाने (अहं) तोच भोक्ता, संवेदनशील विचारक होतो. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो 'पालनकर्ता'. तोच सर्व विश्वाचे उपादान[1] कारण असल्यानें सर्व नामरूपात्मक जगताचा आधार पालक आहे.
(८८) सुखदः :  - जो आपल्या भक्तांना मुक्ती प्रदान करून परमसुखाचे दान करतो तो. श्लोकाची फोड  करतांना कांही टीकाकार 'अ-सुखद' अशीही करतात. व त्याप्रमाणे या संज्ञेचा अर्थ होतो जो आपल्या भक्तांची संकटे दुःखे (असुख) नाहीशी करतो (द) तो श्रीविष्णु.
(८९) नैकजः :  - न -एक ज. जो एकच वेळा जन्मलेला नसून अनेकवेळां अनेक आकारांत जन्मलेला आहे व भक्तांची सेवा करण्याकरतां ज्याने अनेक अवतार धारण केले आहेत असा. खरे तर सर्व सृजन (जन्म) ही त्याचीच व्यक्त अवस्था आहे. सर्व जड विश्वातील दिव्यचैतन्य तोच आहे. तेच एक चैतन्य सर्व साधनांमधून असंख्य गुणांनी नृत्य करत असते.
(८९) अग्रजः :  - जो प्रथम जन्मास आला आहे असा. अर्थात त्याचे पासूनच सर्वांची उप्तत्ति झाली. ते प्रथम कारण हीच श्वराची संकल्पना आहे. ज्याचेपासून सर्वविश्व झाले, ज्याचेमध्ये सर्वांचे अस्तित्व टिकून राहते व ज्याच्यामध्ये सर्वांचा लय होतो तोच (तत्) ईश्वर आहे असे मानले जाते.
(८९) अनिर्विण्णः :  - ज्यास कधीच निर्वेद (खेद) होत नाही असा. त्याला कधी खेद निराश होण्याची शक्यताच नाही कारण तो नेहमीच स्वतः परिपूर्ण आहे. जेव्हा एकादी अंतःकरणातील तीव्र इच्छा पूर्ण होत नाही तेंव्हा येणारी दुःखद वेदना, निराशा म्हणजे निर्वेद, व ज्यास निर्वेद नाही तो अनिर्विण्ण. तो नित्य तृप्त व पूर्ण असल्याने त्याची अतृप्त इच्छा कुठलीच नसते. किवा भविष्यातही पूर्ण करावयाची नसते. गीतेमध्ये भगवंत सांगतात, 'मला प्राप्त झाली नाही अशी कुठलीच वस्तू नाही [2] किवा अजून प्राप्त करावयाचेही कांही नाही.
(८९) सदामर्षी :  - जो भक्तांच्या अपराधाची नेहमी क्षमा करतो तो नारायण अत्यंत दयाळू आहे.
(८९) लोकाधिष्ठानं :  - सर्व जड चेतन विश्वाचे एकमेव अधिष्ठान आधार असा श्रीविष्णु.
(८९) अद्‍भुतः :  - तो अत्यंत आश्चर्यकारक आहे. गीता प्रतिपादन करते ’ते आश्चर्य आहे’[3] व उपनिषदे त्या आश्चर्याचा उद्‍घोष करतात की तो आश्चर्यच आहे, त्याचे आख्यान करणारा शिक्षक (आचार्य) आणि ते ऐकणारा शिष्यही आश्चर्यच आहे. सर्वच आश्चर्यमय आहे.
     एकाद्या अद्‍भुत अनुभवानें एकाद्या क्षणी जेव्हा अनुभविणार्‍याचे मन बुद्धि पूर्ण निस्तब्ध होते त्या स्थितीला आश्चर्य असे म्हणतात. तो अनुभव मनाला कोंडून धरतो बुद्धिला स्तब्ध करतो व त्यामुळे कुठलीच संवेदना अगर विचार बाहेर पडू शकत नाही. हा साक्षात्काराचा क्षण अंतःकरणाच्या जाणीवेपलीकडला असतो त्यामुळे या अनंताच्या अनुभवाच्या वेळी होणार्‍या अंतःस्थितीचे वर्णन आपल्या धर्मग्रंथातून आश्चर्य असे केले आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.




[1]    भुज पालनाभ्यवहारयोः ।
[2]   नांनवाप्तमवाप्तव्यं  ।। गीता ३-२२
[3]   आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनं आश्चर्यवद् वदति तथैवचान्यः । आश्चर्यवचैनं अन्यः शृणोति श्रृत्वप्येनं वेद न कश्चित् ॥ गीता-२.२९

No comments: