19 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १००

श्लोक १००
अनंतरूपोनन्त श्रीर्जितमन्युर्भयापहः 
चतुरस्त्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः  ।।
(९३) अनंतरूपः :  - ज्याची असंख्य रूपे आहेत असा, जगतातील वस्तूजाताचे असंख्य आकार व रूपे आहेत व हे त्याचेच प्रकटी करण आहे, तत्वतः ते दुसरे काहीच नसून प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. स्वप्नातील संपूर्ण वस्तूजाताचा विस्तार ज्याप्रमाणे एकाच जागृत व्यक्तिच्या मनाची निर्मिती असते, व जाणीवेच्या अर्धजागृत अवस्थेत (स्वप्नात) त्याचीच अनेकत्वाने प्रतीति येते त्याचप्रमाणे जेव्हा परमार्थ साधकास नारायण-भावामध्ये पुनर्जागृती येते येते त्यावेळी दृश्य, भावना व विचारांनी निर्मित झालेले जगत हे दुसरे कांही नसून त्या नारायणाचे स्वरूप आहे असे त्यास प्रतीत होते.
(९३) अनंतश्रीः :  - जो अनंत वैभवाने परिपूर्ण आहे असा. किवा जो अतुलनीय शक्तिनें समृद्ध आहे असा. भगवंत आपल्या मुख्यतः तीन शक्ति जगतात प्रकट करतो व त्या आहेत इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति. त्याच्या ह्या दिव्य शक्ती आपल्यामधून शारीरिक, मानसिक व बौद्धिक पातळीवर प्रगट होतात.[1] ह्या त्याच्या तीनही शक्ति व त्यांची एकमेकातील गुंतागुंतीची क्रिडा यातूनच या जगतातील चैतन्याचे क्रियाशील ताणेबाणे विणले जातात. आत्मस्वरूप नारायण हाच ह्या स्पंदनशील जीवनाचा आधार आहे म्हणूनच त्या सर्वज्ञानी ईश्वरास 'अनंतश्री' म्हटले आहे.
(९३) जितमन्युः :  - ज्याने क्रोध जिंकला आहे असा. मन्युः या संज्ञेमधील मतीतार्थ स्पष्टच असल्यानें त्याच्या पुनरावृत्तीची वश्यकता नाही. परंतु क्रोध हा आपल्यामधीलच शत्रु आपल्यावर वर्चस्व गाजवित असतो. व ज्याने क्रोध जिंकला आहे तो आपल्या शुद्ध सत्‌स्वरूपामध्ये प्रतिष्टीत झालेला असतो. यापूर्वीच आपण क्रोध-विकाराची प्रक्रिया विशद केलेली आहे. जेव्हा मनुष्याच्या मनांत इच्छा निर्माण होतात व त्या पूर्ण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तेंव्हा अतृप्तीमुळे त्या अडचणी विरूद्ध मनुष्याच्या मनांत क्रोध भडकतो. आत्मा हा परिपूर्ण असल्यानें त्याला कशाचीही इच्छा, गरज, अगर अपूर्णता नाही. त्यामुळे श्रीनारायणाजवळ हा क्षुद्र आत्मघातकी क्रोध कधीही वास्तव्य करीत नाही.
(९३) भयापह :  - जो सांसारिक भय दूर करतो नाहीसे करतो तो. तुफान वासनांच्या सागर लाटांमध्ये सापडलेली व त्यांच्या निर्घृणतेने सतत डगमगणारी जीवननौका शांततेचे व पूर्वस्थैर्याचे सुख मिळवूं शकेल असे एकच आश्रयस्थान आहे ते म्हणजे श्रीनारायण.
(९३) चतुरस्त्रः :  - जो सर्व बाजू सर्वतर्‍हेने समर्थपणे सांभाळतो असा. चतुरस्र ही संज्ञा भूमितीमध्ये चारही बाजू समान असणार्‍या चौकोनास दिली जाते, श्री नारायण सर्वांना त्यांची कर्मफले समानतेने देतो. जो तो आपल्या पूर्वकर्मानुसार योग्यच बक्षिस मिळवितो. म्हणून न्यायानें व योग्य तर्‍हेने फल देणारा नारायण चतुरस्र आहे.
(९३) गभीरात्मा :  - मनासारख्या दुर्बल साधनानी ज्याच्या खर्‍या स्वरूपातील गंभीरतेचा, खोलीचा कधीच ठाव लागू शकत नाही तो गभीरात्मा श्री नारायण होय. या ठिकाणी गंभीरता म्हणजे खोली किवा व्यापकता. विश्वाला व्यापून असणारे ते परमतत्व अत्यंत महान् व अमर्याद गूढ (खोल) आहे.[2]
(९३) विदिशः :  - जो दानामध्ये वैशिष्ठ्यपूर्ण आहे असा. त्याची उदारता दिव्य, भव्य असल्यानें सर्व खर्‍या भक्तांच्या प्रामाणिक इच्छा पूर्ण करण्यामध्ये परिपूर्ण आहे.
(९३) व्यादिशः :  - आपले शासनादेश कार्यवाहीत आणण्यामध्ये जो समर्थ आहे असा. तो सर्व पंचमहाभूते, देव देवतांस कार्याचे आदेश देतो.
(९४०) दिशः :  - जो उपदेश देतो व ज्ञानही देतो असा. तो परमात्माच वेदांचाकर्ता आहे, त्याचा मुख्य विषय व तत्त्वही तोच आहे. श्रीनारायण श्रुतींच्या रूपांनें मनुष्यास स्वतःचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे ज्ञान देतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   अनुक्रमे शरीराच्या कार्यातून क्रियाशक्ति, मनाच्या कार्यातून इच्छाशक्ति व बुद्धिमधून ज्ञानशक्ति आपल्या अनुभवास येते.
[2]   निम्नं गभीरं गंभीरम् । अमरकोश.

No comments: