28 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०३

श्लोक १०३
प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत्प्राणजीवनः 
तत्वं तत्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः  ।।
(९५) प्रमाणम् - जो स्वतः वेदस्वरूप आहे असा. वेद हेच त्या परमसत्याचे प्रमाण आहेत. किवा दुसर्‍या तर्‍हेने असे म्हणता येईल की जो शुद्ध चैतन्य स्वरूप (प्रज्ञानम्) आहे तो. श्रुतीमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे "प्रज्ञानं ब्रह्म" म्हणजे प्रज्ञान हेच ब्रह्म आहे.
(९६०) प्राणनिलयः :  - ज्याचेमध्ये सर्व प्राण स्थित होतात असा. तोच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व क्रियांचा मूलभूत चैतन्यदायी आधार आहे.
(९६) प्राणभृत् :  - सर्व प्राणांवर जो अधिशासन करतो तो. श्रीहरीच स्वतः प्रत्येक प्राणीमात्रास अन्न खाणे पचविणे, उत्साही वाटणे, क्रिया करणे व त्याची फलप्राप्ती करून घेणे, प्रौढ होणे, मरणे इत्यादी कर्मे करावयास लावतो. या सर्व कर्मामध्ये कर्माध्यक्ष दिव्यचैतन्य असा आत्मा श्री नारायण आहे. आत्मा पृथ्वीतलावरील सर्व प्राण्यामध्ये शांत व अलिप्त राहून त्यांच्या सर्व क्रिया स्वतःच्या अस्तित्वाने प्रवर्तित करतो व घडवून आणतो व चालू ठवतो.
(९६) प्राणजीवनः :  - सर्व प्राणीमात्रांस श्वासोच्छवासाचे द्वारा जीवंत ठेवतो तो प्राणजीवन. ही संज्ञा येथे तशी फारशी आनंददायक वाटत नाही कारण या आनंददायी अर्थाची संज्ञा या पूर्वीच येवून गेली आहे. अर्थात प्रेमामध्ये प्रेमिकानें आपल्या प्रेमास्पदास कितीवेळा त्याच त्याच नावानें हाक मारावी याला कांही नियम नाही !! परंतु आपण आणखी खोल विचार केल्यास जास्त नवा अर्थ सुचतो तो म्हणजे प्रत्येक श्वासालाही चैतन्याचा दिव्य स्पर्श करणारा तो 'प्राणजीवन' श्रीहरि होय.
(९६) तत्वम् :  - 'सत्य' - जे नित्य असून साररूप (तत्व) आहे. साक्षात्कारामध्ये ज्याचा अनुभव येतो ते तत्व आत्मा श्री नारायण आहे. [1]
(९६) तत्ववित् :  - ज्याला सत्यज्ञान पूर्णतः झाले आहे असा. म्हणजेच त्या आत्म्याचे स्वस्वरूपच होय. त्या आत्म्याचे ज्ञान झाले असतां ते जाणणारा आत्मस्वरूप होन जातो. [2] आत्मस्वरूप नारायणच ब्रह्मस्वरूप सत्य पूर्ण जाणतो कारण तेच त्याचे स्वरूप आहे.
(९६) एकात्मा :  - अद्वैत सत्य. एक आत्मस्वरूप नारायणच या विश्वातील चराचरातून जीवरूपाने अनंतरूपाने प्रकट होतो.
(९६) जन्ममृत्युजरातिगः :  - ज्याचेमध्ये कुठलाही बदल परिवर्तन होत नाही असा, जगातील प्रत्येक क्षणभंगुर वस्तू सतत बदलत असते व तो बदल अत्यंत दुःखदायक असतो. हे बदल म्हणजे जन्म, वर्धमान होणे, क्षीण होणे, विकार होणे, मृत्यु पावणे. ज्यास यातील कुठलाच बदल स्पर्श करूं शकत नाही असा आत्मस्वरूप नारायण अनंत शाश्वत सम व महान आहे. त्याचे स्वरूप स्पष्ट करताना गीतेने उद्‍घोषित केले आहे, 'जो जन्मरहित आहे, कधीही मृत होत नाही, व नेहमीच अस्तित्वात असलेल्या त्याचे अस्तित्व कधीच नष्ट होत नाही.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   तत् त्वं इति विज्ञानमेव तत्त्वम् ।
[2]   स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति - मुंडकोपनिषत् ३.२.९
[3]   न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ गीता २.२० – तो जन्मलेला नाही व कधीच मृत्यू पावत नाही, एकदा असल्यानंतर त्याचे नसणे कधीच संभवत नाही. तो अजन्मा, नित्य, विकाररहित व पुराण असून शरीर आहत झाले तरी मारला जात नाही.

No comments: