07 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९६

श्लोक ९६
सनात्सनातनतमः कपिलः कपिरप्ययः 
स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्तिदक्षिणः  ।।
(८९) सनात् :  - ज्यास आदी नाही अंतही नाही असा. काल त्याला मर्यादित करूं शकत नाही. दिक् व कालाची संकल्पनाही त्या आत्मप्रकाशामुळेच प्रकाशित होते. प्रतीतिस येते. तो विकाररहित असल्यानें काल होता, आज आहे व अनंतकाल रहाणार आहे.
(८९) सनातनतमः :  - सर्वात सनातन (पुराण) असा. त्याचेपासूनच प्रथम बुद्धि स्फुरली व त्या बुद्धिनेच कालाची संकल्पना केली. कालाचा प्रथम अनुभव घेतला गेला त्याच्याही आधी ती प्रतीति घेणारा तो होताच त्यामुळे तो सनातनतम आहे.
(८९) कपिलः :  - भगवंत स्वतः सांख्य तत्वज्ञानाचा उद्‍गाता कपिलमुनी या स्वरूपात व्यक्त झाले आहेत. भगवान् आपल्या विभूती सांगताना  'मुनी'मध्ये मी कपील आहे[1] असे सांगतात.
(८९) कपिः :  - जो जल पितो तो. आपल्या किरणांनी सूर्य पृथ्वीतलावरील सर्व वस्तूंमध्ये असलेले जल शोषून घेतो म्हणून तो कपि आहे.[2]
(९००) अप्ययः :  - ज्याचेमध्ये सर्व विश्व लय पावते तो. महाप्रलयाचे वेळी समष्टि मनरूपी ब्रह्माही त्यांत लय पावतो असें परमतत्व. ते परमतत्व जेव्हा समष्टि मनातून कार्य करूं लागते तेंव्हा त्यांस 'ब्रह्मा' असे म्हटले जाते. प्रत्येक मन आपल्या वासनांनी कार्यप्रवृत्त होत असते. या विश्वातील समष्टि वासना म्हणजेच विश्वाचे महाकारण माया होय. जेव्हा परमतत्व या महाकारणदेहातून व्यक्त होते तेंव्हा त्याला 'ईश्वर' असे म्हटले जाते. याच ईश्वररूप नारायणामध्ये सर्व अनुभव-विश्व विलीनही होत असते. वस्तू, विचार, भावनांमधून प्रकट होणार्‍या संपूर्ण जगताची उत्पत्ति व विलय या दोन गतीमान अवस्थांमध्ये एक स्तब्धतेची अवस्था असते व त्या कालात समष्टि मन विश्रांत पावते. उत्तरेकडील पाठभेदांत 'अव्यय' असे म्हटले आहे व त्याचा अर्थ क्षयरहित हे स्पष्टच आहे.
(९०) स्वस्तिदः :  - जो आपल्या सश्रद्ध भक्तांचे मंगल (स्वस्ति) करतो तो. परमानंदस्वरूप श्रीहरिचा शोध व प्राप्ती करून घेण्यामध्येच ज्याला आपल्या जीवनाची पूर्णता आहे हे समजते तोच खरा निष्ठावान भक्त होय. म्हणूनच तो सर्व अमंगलापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतो. जितक्या प्रमाणांत तो भगवत स्वरूपाशी एकरूप होवूं शकतो तितक्या प्रमाणांत त्यास तो परमानंद प्राप्त होतो. अर्थात कल्याण प्राप्त होते. म्हणून भगवंतास 'स्वस्तिद' असे म्हटले आहे.
(९०) स्वस्तिकृत् - पूर्वीच्या कृत् हे उपपद लागलेल्या अनेक संज्ञांचे जसे दोन तर्‍हेचे अर्थ होतात तसेच याही संज्ञेचे दोन तर्‍हेने अर्थ होतील. (१) स्वस्ति - मंगल प्रदान करणारा (२) मंगल हरण करणारा. जो भक्त नारायण-भावामध्ये जितका अधिकाधिक प्रगत होत रहातो तितका त्याला आयुष्यांत धिकाधिक आनंद व शांतीचा अनुभव ये लागतो. परंतु जे नेहमी इंद्रिय सुखाच्या मागे लागलेले असतात व सत्यापासून दूरदूर जातात त्यांचा अनुभव म्हणजे उत्तरोत्तर दुःख, मानसिक क्षोभ, अश्रु व शोक. सर्व अमंगलच. 'स्वस्ति' हे संस्कृत अव्यय मंगलवाचक आहे.
(९०) स्वस्ति :  - जो सर्व मंगलाचे उगमस्थान आहे असा. कारण तो स्वतःच मंगल आहे. त्याचे स्वरूपच सत्-चित् -आनंद असे असल्यानें त्याचे ठिकाणी कुठलेही अमंगल असू शकत नाही. जीव हा  अविद्येच्या अधीन राहून मायेच्या आसक्तितच कार्य करीत असतो[3] तर परमेश्वर मायेवर अधिसत्ता गाजवतो म्हणजेच मायेच्या बाहेर राहूनही मायेतून कार्य करतो.
(९०) स्वस्तिभुक् :  - जो निरंतर आपल्या पवित्रतेचा, मंगलतेचा अनुभव घेत असतो तो. कारण मांगल्य हाच त्याचा दिव्यभाव आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल जो आपल्या भक्तांवर सतत कृपेचा वर्षाव करतो त्यामुळे त्या भक्ताला आपल्या प्रेममय समर्पित हृदयामध्ये पवित्रतेचा अनुभव येत रहातो. असा श्रीविष्णु स्वस्तिभुक आहे.
(९०) स्वस्तिदक्षिणः :  - जो आपल्या भक्तांना मांगल्य प्रदान करण्यामध्ये सतत उत्सुक असतो असा. दक्षिणा या शद्बाचा अर्थ बक्षिस असा होतो. त्याखेरीज जो कुशल व लवकर कार्य करतो तो दक्षिण असाही होतो. (क्षिप्रकाशी) अर्थात, श्रीनारायण आपल्या भक्तांना मांगल्याचा अनुभव देण्याकरता शीघ्रतेने पोहोचतो कारण तो त्याचा स्वभावच आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सिद्धानां कपिलो मुनिः – गीता १०.२६
[2]   'कं जलं, पितीति कपिः ।
[3]   ईश्वराधीना माया.. अविद्याधीनः तु जीवः ।

No comments: